कामात गती येणार का? देवळाई चौक ते शिवाजीनगर रेल्वे फाटकाखाली काम सुरू
By साहेबराव हिवराळे | Published: January 4, 2024 11:40 AM2024-01-04T11:40:44+5:302024-01-04T11:50:33+5:30
शिवाजीनगरकडूनही खोदकाम अन् लोखंडी चटई बांधणे हळूहळू सुरू
छत्रपती संभाजीनगर : देवळाई चाैक ते शिवाजीनगर रेल्वे फाटकातून दररोज मार्ग काढताना होणारी अडचण आणखी बरेच दिवस नागरिकांना सहन करावी लागणार आहे. शिवाजीनगर अथवा देवळाईत राहणाऱ्यांना वाहन रुळापलीकडे पार्क करून जीव मुठीत धरून रूळ ओलांडावे लागतात.शिवाजीनगरकडून खोदकाम अन् देवळाईकडून लोखंडी चटई बांधणे सुरू असले तरी कामात अधिक गती येणार का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
रेल्वे रुळाखाली २५ फूट खोलवर सिमेंटचा बॉक्स बसवून मार्ग मोकळा केला जाणार आहे, येणाऱ्या काळात शाळकरी मुलांच्या बस सुरळीत दुतर्फा जाऊ शकतील, यादृष्टीने कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे; पण आजघडीला बहुतांश नागरिकांना रुळ ओलांडूनच ये- जा करावी लागत आहे. बहुतांश रहिवासी दुचाकी उभी करून ठेवतात अन् रुळ ओलांडतात. सायंकाळी घरी जाताना रेल्वे रुळाजवळ पार्क केलेली दुचाकी घेऊन परततात.
संग्रामनगर पुलावर कोंडी वाढली
या कामामुळे सर्व भार संग्रामनगर उड्डाणपुलावरच आलेला दिसत आहे. याठिकाणीही सर्व्हिस रोडच्या कामाचा खोळंबा अद्याप संपलेला नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा प्रवासी रेल्वे स्टेशन, पैठण रोड आणि झाल्टा फाटा, अशा पद्धतीने प्रवास करीत आहेत.
पुलाच्या कामाची गती हवी
अति गंभीरप्रसंगी नागरिकांना दूरवरून फेरा मारून आणि गर्दीतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे पालक मंडळी, तसेच नागरिकांची गैरसोय वाढलेली आहे. त्यासाठी कामाची गती वाढवावी, अशी मागणी राजेंद्र राठोड, नीलेश भाग्यवंत, हरिभाऊ राठोड, रोहन पवार आदींनी केली आहे.