राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी स्वतंत्र आयोग येणार?
By राम शिनगारे | Published: October 17, 2024 08:02 PM2024-10-17T20:02:05+5:302024-10-17T20:04:59+5:30
उच्च शिक्षण विभागाने मागितले अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे मत
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकांची भरती प्रक्रिया स्थानिक पातळीवर करण्यात येते. मात्र, कुलपती विद्यापीठस्तरीय प्राध्यापक भरतीसाठी स्वतंत्र बोर्ड किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरती करण्यासाठी आग्रही आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र पाठवून अभिप्राय मागविल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य शासनाने अकृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार काही विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीसाठी अर्जही मागविले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही ७२ जागांच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते. मात्र, सत्ताधारी पक्षाशी संबंधित संघटनांनी कुलगुरूंचा कार्यकाळ कमी असल्याचे कारण दाखवून प्राध्यापक भरती थांबविण्याची मागणी केली होती. त्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापक भरती रखडलेली आहे. विद्यापीठास नव्या आरक्षण प्रणालीनुसार प्राध्यापक भरतीसाठी अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्याचवेळी राज्यातील नागपूर, गडचिरोली येथील विद्यापीठांमध्ये झालेल्या प्राध्यापकांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचे आरोप झाले होते.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या कुलपतीपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती झाल्यानंतर विद्यापीठातील प्राध्यापक भरतीमध्ये सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना केलेली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी एक स्वतंत्र आयोग असावा, त्यादृष्टीने चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसारच राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना पत्र पाठवून स्वतंत्र आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विद्यापीठांमधील प्राध्यापकांची भरती करण्याविषयी मत मागविले आहे. कुलगुरूंनी प्राध्यापक भरतीविषयी स्पष्ट मत दिल्यानंतर त्याविषयी अधिकृतपणे निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन कुलगुरूंची समिती स्थापन
विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करून नेमणूक केली जावी किंवा एमपीएससीकडे पदभरती सोपवावी, याविषयी अभ्यास करण्यासाठी मराठवाडा आणि मुंबईतील प्रत्येकी एका विद्यापीठाच्या कुलगुरूंची दोन सदस्यीय समिती स्थापन केल्याची माहितीही समोर आली आहे.