शंभर कोटीतील रस्तेही ‘धडधड’करणारे होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:43 PM2019-02-02T23:43:22+5:302019-02-02T23:43:48+5:30
औरंगाबाद : महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते औरंगाबादकरांना दिलासा देणारे नव्हे तर त्रासदायक ठरत आहेत. ...
औरंगाबाद : महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते औरंगाबादकरांना दिलासा देणारे नव्हे तर त्रासदायक ठरत आहेत. मनपाच्या प्रत्येक सिमेंट रस्त्यावर वाहन ‘धडधड’करते. रस्ते शंभर टक्के गुळगुळीत करणारी अत्याधुनिक ‘फिक्स फार्म काँक्रीट पॉवर’ मशीन आजपर्यंत वापरण्यातच आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील कामाचा अनुभव लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने १०० कोटींच्या रस्त्यांमध्ये प्रत्येक कंत्राटदाराला या मशीनची सक्ती केली आहे. विशेष बाब म्हणजे एकाही कंत्राटदाराने मशीन खरेदी केलेली नाही.
महाराष्टÑ शासनाने २०१४ मध्ये शहरातील सहा रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २४ कोटी रुपये दिले. त्यापूर्वी मनपाने ३० कोटी रुपये खर्च करून क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्ता तयार केला. याशिवाय महापालिकेने शहरातील अनेक भागांत ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंतचे रस्ते तयार केले. प्रत्येक रस्त्यावर आज वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दुचाकी असो किंवा चारचाकी वाहन; धडधड अटळ आहे. सर्व निकष धाब्यावर बसवून महापालिका रस्ते तयार करीत आहे. सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर, पुंडलिकनगर रोड, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन आदी अनेक रस्त्यांवर लहान खड्डे आहेत.
महाराष्टÑ शासनाने जून २०१७ मध्ये शहरातील ३० रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटी निधी दिला आहे. या रस्त्यांची कामे आता सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३ जानेवारीला रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन टीव्ही सेंटर येथे करण्यात आले होते. ही कामेही गुळगुळीत सिमेंट रस्त्यांच्या नावावर धडधड करणारी असतील का? असा प्रश्न औरंगाबादकर उपस्थित करीत आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.
‘फिक्स फार्म काँक्रीट पॉवर’ मशीनचा वापरच नाही
आरएमसी प्लँटमधून सिमेंट काँक्रीट रस्ते साईडवर येतात. दोन्ही बाजूने आडव्या लावलेल्या लोखंडी खांबाच्या आतील भागात सिमेंट काँक्रीट टाकण्यात येते. ३० अंश सेल्सिअस तापमानातच हे काम करायला हवे. जास्त उष्णता असेल तर रस्त्याला तडे जाण्याची दाट शक्यता असते. सिमेंट काँक्रीटची लेव्हल कर्मचारी लावून केल्या जाते. ही पद्धत चुकीची आहे. काँक्रीट दाबण्यासाठी आणि रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी ‘फिक्स फार्म काँक्रीट पॉवर’ मशीन आवश्यक आहे. याचा वापरच आजपर्यंत महापालिकेने केलेला नाही. त्यामुळे प्रत्येक रस्ता धडधड करणारा तयार होत आहे.
अटी-शर्तींमध्ये मशीनचा समावेश
१०० कोटींच्या निविदा प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने ‘फिक्स फार्म काँक्रीट पॉवर’ मशीन अनिवार्य असल्याचे नमूद केले आहे. मनपाने १०० कोटींची कामे चार कंत्राटदारांना दिली आहेत. परंतु कंत्राटदारांनी हे मशीन खरेदी केलेले नाही. एका कंत्राटदाराने खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी काही कंत्राटदारांनी भाडेतत्त्वावर मशीन आणली होती. पैठण रोडचे काम करताना या अत्याधुनिक मशीनचा वापर करण्यात आला होता.
दोन पर्याय दिले आहेत
१०० कोटीतील कामे करताना कंत्राटदारांना फिक्स फार्म किंवा स्लीप फॉर्म पद्धतीच्या मशीनचा वापर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. या मशीन व्हायब्रेटरप्रमाणे काम करतात. रस्ता जास्तीत जास्त गुळगुळीत कसा होईल यादृष्टीने काम करून घेण्यात येणार आहे.
एम. बी. काझी, कार्यकारी अभियंता
---------