लोकाभिमुख कामांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार !
By Admin | Published: April 29, 2017 11:24 PM2017-04-29T23:24:57+5:302017-04-29T23:33:15+5:30
लातूर : मावळते जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना निरोप देण्यात आला. तर नूतन जिल्हाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले़
लातूर : अकोलेकरांच्या प्रेमाचा गुलाम होऊन मी लातुरात आलो आहे. जिल्हाधिकारीपेक्षा जलाधिकारी म्हणून लोकप्रिय झालेल्या पांडुरंग पोले यांच्या कामाचा वारसा पुढे नेण्याचा मी प्रयत्न करणार आहे़ शिवाय, लोकाभिमुख राहणे हेच माझे कर्तव्य असणार आहे, असे प्रतिपादन लातूरचे नूतन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शनिवारी केले.
जिल्हा परिषदेच्या डीपीसी हॉलमध्ये शनिवारी आयोजित कार्यक्रमात बोलत होते़ यावेळी मावळते जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना निरोप देण्यात आला. तर नूतन जिल्हाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ होते. मंचावर अप्पर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदरकर, महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार उपस्थित होते़ दरम्यान, पोले आणि जी़ श्रीकांत यांचा विविध संस्था, संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पोले म्हणाले, लातूरची संस्कृती वेगळी आहे. लोकांना विश्वासात घेवून काम केले. दुष्काळासारख्या भीषण परिस्थितीवर आम्हाला मात करता आली़ याचे पूर्ण श्रेय लातूरचे नागरिक आणि माध्यमांना असल्याचे ते म्हणाले़ याशिवाय, लोककल्याणाची कामेही मोठ्या प्रमाणावर करता आली, याचे समाधान आहे़ प्रास्ताविक डॉ. अनंत गव्हाणे यांनी केले़ सूत्रसंचालन गणेश सरोदे यांनी तर आभार महादेव पांचाळ यांनी मानले़ कार्यक्रमास अधिकारी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते़