आवड तिथे सवड; ब्राझील, फ्रान्सच्या तरुणींना लागला मराठीचा लळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 04:33 PM2020-02-27T16:33:55+5:302020-02-27T16:37:13+5:30
या दोघी जून २०१९ मध्ये भारतात आल्या.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : नमस्कार, आपले आमच्या घरात स्वागत आहे, असे म्हणत ज्योतीनगरातील तात्पुरत्या वास्तव्यास असलेल्या तरुणींनी संवाद साधला, या तरुणी काही महाराष्ट्रीयन नाही. त्या ब्राझील,फ्रान्सच्या नागरिक आहेत. हे वाचून आपणास आश्चर्याचा धक्का बसला असेल. या विदेशी तरुणींचे कौतुक यासाठी की, त्या अवघ्या तीन महिन्यांत मराठी बोलण्यास शिकल्या.
मराठी भाषेचा लळा लागलेल्या त्या तरुणींचे नाव लेटिशिया मोदानेझ (ब्राझील) व मेलिन लाग्राद (फ्रान्स) होय. रोटरी युथ क्लचरल एक्सचेंज अंतर्गत या दोन तरुणी औरंगाबादेत आल्या आहेत. ज्योतीनगरातील मेधा आठले यांच्या निवासस्थानी त्या दोघी वास्तव्यास आहे. लेटिशिया देवगिरी कॉलेजमध्ये १२ वी विज्ञान शाखेत शिकत आहे, तर मेलिन ही ११ वीचे शिक्षण घेत आहे. या दोघी जून २०१९ मध्ये भारतात आल्या. यातील लेटिशिया ही पहिले चार महिने ठाकरेनगरातील राजू वरकड यांच्याकडे राहिली. मराठीची गोडी कशी लागली हे लेटिशिया कधी मराठी तर कधी इंग्रजीमध्ये सांगत होती. ‘मला येथील संस्कृती,मराठी भाषेचा काहीच गंध नव्हता. हिंदी भाषाही मला येत नाही. मात्र, वरकड कुटुंबात मी काही दिवसातच मिसळून गेले. कारण, हे कुटुंब एकत्रित आहे. आजी,आई व वडील,काका,काकू, मावशी असे सर्व नाते येथे मला मिळाले. अधूनमधून त्यांचे नातेवाईकही घरी येत. आजी माझ्यावर खूप प्रेम करीत. अग, अस करू नको, अग तस करूनको, अरे देवा, जाऊ नको, थांब ना गं, आहे की नाही, असे शब्दही आजीकडूनच शिकले. ‘बा बो’ म्हणताना खूप छान वाटत होते. सुरुवातीला मी त्यांच्या हालचालींचे आकलन करीत होते. नंतर ‘ग्लास दे’, ‘तिथे ठेव’, खुर्ची, टेबल हे शब्द शिकले. मीसुद्धा मराठीचे शब्द उच्चार करूलागले ते सर्वांना आवडू लागले. मलाही त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संवाद साधता येऊ लागला. थोडे थोडे मराठी बोलत असत ते सर्वांना समजत असत. वरकडांचे मोठे कुटुंब आहे फेस्टिव्हलच्या निमित्ताने त्यांचे सर्व नातेवाईक एकत्र येत. गणपती उत्सव, महालक्ष्मी, नवरात्र, दिवाळी या सणात मी त्यांच्या घरीच होते. मला लाडू खूप आवडला. बाहेरही जेव्हा मी खरेदी करायला जाते, तेव्हा मला मराठीत बोलताना पाहून येथील लोक सरप्राईज होत.
बोलता, बोलता लेटिशिया म्हणाली की, मी आणखी दोन महिने भारतात आहे. मराठी भाषा खूप चांगली आहे, आणखी शिकायची आहे. सध्या मी थोडे थोडे बोलू शकते; पण मला लिहिता व वाचता येत नाही. तिच्यासोबत असलेली फ्रान्सची मेलिन म्हणाली की, मला लेटिशियासारखी मराठी बोलता येत नाही; पण थोडे थोडे बोलते व कळते. मला जे वर्ड (शब्द) समजत नाही ते गुगलवर सर्च करते, असे सांगत तिला मराठी शिकण्याची इच्छा आहे; पण फ्रान्समध्ये गेल्यावर कोणी बोलण्यास मिळाले नाही, तर मी मराठी विसरून जाईल, अशी खंतही तिने व्यक्त केली. विदेशातील तरुणी येथे येऊन अवघ्या तीन -चार महिन्यांत मराठी बोलू लागतात, त्यांना आपल्या भाषेची गोडी लागते हीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट होय.
आईशी फोनवर बोलते मराठी
लेटिशियाने सांगितले की, येथे मराठी बोलण्याची एवढी सवय झाली की, माझ्या आईचा जेव्हा ब्राझीलमधून फोन येतो तेव्हा मी अधूनमधून हो, नाही, असं नाही गं, अरे देवा असे शब्द बोलून जाते. आईला काही समजत नाही. मी येथे आल्यापासून आता संपूर्ण शाकाहारी बनले आहे. आमच्या देशात वर्षात ४ ते ५ फेस्टिव्हल होतात. मात्र, येथे नेहमी फेस्टिव्हल सुरूअसतात. नुकतीच शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली, हे सुद्धा तिने सांगितले.
भांडायला आवडते
मेलिन हसत सांगत होती की, मला येथे रिक्षावाल्यांशी भांडायला खूप आवडते. एकदा एमजीएममधून ज्योतीनगरला जाण्यासाठी रिक्षा स्टँडवर आम्ही गेलो तिथे रिक्षावाल्यांनी आमच्याकडे पाहिले व फॉरेनर असे म्हणत इंग्रजीत ८० रुपये भाडे लागेल असे सांगितले, तो मराठीतून टोमणाही मारत होता हे आमच्या लक्षात आले. मी म्हणाले अरे आम्हाला पण मराठी येते, ३० रुपयांत नेतो का, आम्ही दुसरी रिक्षा बघू, असे म्हणताच त्याला धक्काच बसला. अनेकदा प्रोझोन मॉलला जाताना रिक्षावाले जास्त पैसे मागतात व आमच्याशी भांडतात आम्ही मराठीतून त्यांच्याशी भांडतो तेव्हा त्यांना धक्काच बसतो.
ब्राझीलमध्ये तरुणी नाही सुरक्षित
लेटिशियाने सांगितले की, ब्राझीलमध्ये भारताविषयी खूप बॅड इमेज आहे. मात्र, भारत खूप चांगला देश आहे. औरंगाबाद तर मोठी सिटी नाही, छोटीही सिटी नाही. खूप शांत शहर आहे. भारतात बलात्काराच्या घटना घडतात, तशाच ब्राझीलमध्ये सुद्धा घडतात. आमच्या देशातही तरुणी सुरक्षित नाही. मात्र, भारतात कायदा सशक्त आहे. न्याय लवकर मिळतो; पण ब्राझीलमध्ये कायदा कमकुवत आहे न्याय लवकर मिळत नाही हे तिने स्पष्ट केले.