'लॉटरी लागली, कर्ज घ्या'; मोबाइलवर अनवाँटेड कॉल्स रोखायचे कसे?
By राम शिनगारे | Published: December 29, 2022 12:39 PM2022-12-29T12:39:38+5:302022-12-29T12:40:05+5:30
अनोळखी कॉलला कोणताच प्रतिसाद न देता आपली फसवणूक टाळता येऊ शकते
- राम शिनगारे
औरंगाबाद : मोबाइलवर सतत अनवाँटेड कॉल्सचा मारा सुरू असतो. हे कॉल्स विविध कंपन्या, बँकांची कर्ज घेण्यासाठी असतात. काही कॉल हे फसवणूक करण्यासाठीच केलेले असतात. काही वेळा सूचना देण्यासाठीही कॉल येतात. त्यांना रोखण्यासाठी मोबाइल कंपन्यांकडे ‘डू नॉट डिस्टर्ब ऑफ’ असा मेसेज पाठवावा लागतो. हा मेसेज पाठविल्यानंतरही अनवाँटेड कॉल्स येतच राहतात. ते ग्रुप कॉल असतात. मोबाइलधारक या कॉल्समुळे त्रस्त होऊन जातात. यातून सुटका करून घेण्यासाठी संबंधित कॉलला प्रतिसाद न देणे हेच उत्तम ठरते, असे सायबर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनोळखी नंबरवरूनच होते फसवणूक
फसवणूक करण्याच्या उद्देशाने आलेले कॉल अनोळखी नंबरवरून असतात. त्यामुळे अशा कॉलला प्रतिसाद देण्यात येऊ नये. अनेक वेळा परदेशातून, परराज्यातून कॉल येतात. ते आपल्याला काही तरी आमिष दाखविण्याचा प्रयत्न करतात. त्यास प्रतिसाद दिल्यामुळे आपली फसवणूक होत असते.
कसे रोखाल अनवाँटेड कॉल्स?
ऑनलाइनच्या जमान्यात आपण कोणत्याही ठिकाणी खरेदीसाठी गेल्यानंतर संबंधित ठिकाणी मोबाइल नंबर नोंदवून घेतात. त्यासह इतर ठिकाणांहून मोबाइल नंबर जातात. त्यामुळे सायबर हॅकरही आपले मोबाइल क्रमांक मिळवून त्याद्वारे कॉल करीत असतात. त्यांना रोखण्यासाठी प्रतिसाद न देणे हाच उत्तम पर्याय असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.
११ महिन्यांत मोबाइलवरून शेकडोंची फसवणूक
अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर काही नवीनच माहिती सांगून, बक्षीस लागल्याची थाप मारून, आपली वीज कट करण्यात येत असल्याचे सांगून, ‘केवायसी’चा बहाणा करून फसवणूक केली जाते. त्यात आपल्याला प्रभावित करून बँक डिटेल्सही घेतले जातात. अशा पद्धतीने चालू वर्षात शेकडो जणांची फसवणूक करण्यात आली आहे.
लाखो रुपये उडविले
ऑनलाइन भामट्यांनी सायबर पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या शेकडो तक्रारदारांना लाखो रुपयांना गंडवले आहे. प्रत्येक वेळी फसवणुकीची नवा फंडाही वापरण्यात आल्याचे तक्रारींवरून दिसून येते.
तंत्रज्ञानाचा वापर करा
मोबाइलवर येणाऱ्या अनोळखी कॉलला ओळखण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. आपल्याकडे सोशल मीडियाचे ॲप असतात, तसेच काही मोबाइल क्रमांक ओळखणारे ॲप आहेत. त्याद्वारे कोणाचा कॉल आला होता, हे तपासता येते. त्याशिवाय अनोळखी कॉलला कोणताच प्रतिसाद न देता आपली फसवणूक टाळता येऊ शकते, असे सायबर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी सांगितले.