ताशी १८ किमी वेगाने वाहणारे वारे, ढगांच्या गडगडाटासह बरसला मृग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 12:10 PM2022-06-10T12:10:10+5:302022-06-10T12:12:14+5:30
मान्सूनपूर्व पावसाने शहर चिंब : वादळी वाऱ्याने अनेक भागांतील ‘बत्ती गुल’
औरंगाबाद : मृग नक्षत्राच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी ताशी १८ किमी वेगाने वाहणारे वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटांसह शहरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. काही भागांत हलक्या सरी, तर काही भागांत मध्यम स्वरुपात बरसलेल्या पावासाने शहर चिंब झाले. पावसाच्या हजेरीने वातावरण आल्हाददायक झाले. चिकलठाणा वेधशाळेत १.४ मिमी तर एमजीएम वेधशाळेत ६.० मिमी पावसाची नोंद झाली.
शहरात सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आकाशात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले. काही वेळातच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजता पावसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच पादचारी, दुचाकीचालकांची तारांबळ उडाली. लहान मुलांनी पहिल्या मोठ्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. काही भागांत रिमझिम तर काही भागांत जोरदार पाऊस पडला. काही मिनिटांच्या पावसाने रस्त्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पडत होता.
या भागांत वीजपुरवठा खंडित
सायंकाळी ५.३० वाजता वादळी वारा सुरू होताच अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. गजानन महाराज मंदिर परिसर, जवाहर काॅलनी, गणेश काॅलनी, हर्सूल, माळीवाडा, निशांत पार्क, रेल्वे स्टेशन परिसर, जय भवानीनगर, सातारा परिसर, जाधववाडी, बायजीपुरा, चिकलठाणा, दिल्ली गेट परिसर, छावणी, समाधान काॅलनी, पडेगाव, सेव्हन हिल परिसर, सुराणानगर, सुधाकरनगर, नक्षत्रवाडी, देवळाई चौक, उत्तरानगरी, एन-४, एन-५ दूध डेअरी, पन्नालालनगर, सुहास काॅलनी, मयूरनगर, कटकट गेट परिसर इ. भागांतील वीज ‘गुल’ झाली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी धाव घेतली.
मान्सूनपूर्व पावसाच्या सरी
गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाला गुरुवारी सायंकाळनंतर सुरुवात झाली. हलक्या ते मध्यम पावसाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागली. रात्री ८ वाजेपर्यंत एमजीएम वेधशाळेत ६.० मि.मी. पावसाची नोंद झाली. पुढील काही दिवस साधारण दररोज मान्सूनपूर्व पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे.
- श्रीनिवास औंधकर, हवामान तज्ज्ञ