सोयगावात नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:52+5:302021-02-05T04:07:52+5:30
सोयगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता सोयगाव नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे शहरवासियांची नजर आता नगरपंचायत ...
सोयगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता सोयगाव नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे शहरवासियांची नजर आता नगरपंचायत निवडणुकीकडे लागून आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
सोयगाव नगरपंचायतीचे १७ प्रभागांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानंतर लागलीच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली. गावागावांतील निवडणुकींच्या धामधुमीत नगरपंचायतीच्या निवडणुकीची तीव्रता झाली होती. परंतु, आता ग्रामपंचायतीचे राजकारण संपले असून शहवासियांचे लक्ष नगरपंचायत निवडणुकीकडे लागले आहे. सर्व राजकीय पक्षांचे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. सोयगाव नगरपंचायतीत भाजपा-शिवसेना अशीच सरळ लढत होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
शिवसेनेच्या वतीने सोयगाव नगरपंचायत आपल्याच ताब्यात यावी, यासाठी आतापासूनच रणनीती आखली जात आहे. शिवसेनेकडून महाविकास आघाडीची घोषणा झालेली आहे. परंतु, अद्याप महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फार्म्युला ठरलेला नाही. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या वतीने पूर्वतयारी म्हणून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. दुसरीकडे नगरपंचायतीच्या सत्तेवर असलेले भाजपनेदेखील निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. सध्या भाजपा-शिवसेना यांच्यातच सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. भाजपाला नगरपंचायतीच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेकडून व्यूहरचना आखण्यात येत आहे. भाजपाच्या वतीने कंबर कसली असल्याने सोयगावात नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पुन्हा भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
-------------
सर्वच राजकीय पक्ष लागले कामाला
शिवसेनेच्या वतीने राज्यमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाची पूर्वतयारी हाती घेतली असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते सोयगावात तळ ठोकून आहेत. राज्यमंत्री आमदार अब्दुल सत्तार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ्नेते रंगनाथ काळे, जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे, भाजपाचे इद्रीस मुलतानी आदींनी शहरात संम्पर्क वाढविला असल्याने राजकीय वातावरण वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
---------
नगरपंचायतीच्या पदाची सोडतही निवडणुकीनंतर?
ग्रामपंचायती प्रमाणेच सोयगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचीही सोडत निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण निवडणूक विभागाकडून देण्यात आलेले नाही. याबाबात मात्र राजकीय गोटात प्रश्नचिन्हे निर्माण झाले आहे.