वादळी वाऱ्यासह ‘अवकाळी’च्या सरी
By Admin | Published: April 4, 2016 12:26 AM2016-04-04T00:26:43+5:302016-04-04T00:39:48+5:30
उस्मानाबाद : दिवसभर कडाक्याच्या उन्हानंतर दुपारी चार ते साडेचार वाजेदरम्यान तामलवाडी, अचलेर, परडं्यासह लोहाऱ्याच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला.
उस्मानाबाद : दिवसभर कडाक्याच्या उन्हानंतर दुपारी चार ते साडेचार वाजेदरम्यान तामलवाडी, अचलेर, परडं्यासह लोहाऱ्याच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणच्या शाळांवरील पत्रे उडाले असून विद्युत ताराही तुटल्या. तर बेंडकाळ येथे वीज पडून म्हैस दगावली.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच घराच्या बाहेर पडणे कठीण होत आहे. दुपाच्या सुमारास तर मुख्य रस्त्यांवरही शुकशुकाट पहावयास मिळतो. रविवारी सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र, दुपारी दोन वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होवून वातावरणातील उकाडा कमी झाला. त्यानंतर चार वाजेच्या सुमारास जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथील शकुंतला जगन्नाथ गोरे यांच्या शेतातील झाडावर वीज पडली. या घटनेत झाडाखाली बांधलेली म्हैस जागीच ठार झाली. त्याचप्रमाणे अचलेर परिसरातही जवळपास अर्धातास पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेवरील तसेच कुंभार वस्तीतील काही जणांच्या घरावरील पत्रे उडाले. त्याचप्रमाणे अचेलर शिवारातील विद्युत वाहक ताराही तुटल्या. त्यामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला. दरम्यान, बोरगाव, सलगरा, आलूर येथेही पावसाच्या सरी कोसळल्या. नळदुर्ग परिसरातही साधारणपणे साडेचार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तुळजापूर शहरासह अणदूर परिसरातही पाऊस झाला. येणेगूर येथेही रिमझीम पाऊस पडला.
परंडा शहरातही सहा वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह हलका तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डीपीचा मोठा आवाज झाला. त्यामुळे कोर्ट परिसरासह समतानगर, आदर्श नगर, शिक्षक सोसायटी, समर्थ नगर, राजापुरा गल्ली, मंडई पेठ पसिरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झालेला नव्हता. तहसील कार्यालयातील आपत्कालीन विभागशी संपर्क साधला असता कोणीही उपलब्ध होवू शकले नाही. दरम्यान, वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता पावसामुळे डीपी नादुरूस्त झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर तो दुरूस्त केला जाईल, असे सांगितले.