मद्य, बीअरनिर्मितीला घरघर
By Admin | Published: June 30, 2016 01:01 AM2016-06-30T01:01:51+5:302016-06-30T01:26:27+5:30
औरंगाबाद : पाणीकपातीच्या निर्णयानंतर औरंगाबादेतील युनायटेड स्पिरीट आणि एबीडी अलाईड ब्लेंडर या कारखान्यांतील स्पिरीट व विदेशी मद्यनिर्मिती पूर्णत: थांबली आहे
औरंगाबाद : पाणीकपातीच्या निर्णयानंतर औरंगाबादेतील युनायटेड स्पिरीट आणि एबीडी अलाईड ब्लेंडर या कारखान्यांतील स्पिरीट व विदेशी मद्यनिर्मिती पूर्णत: थांबली आहे. युनायटेड ब्रेवरिज (यूबी) या ‘किंगफिशर’ बीअरची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे उत्पादनही ४० टक्क्यांनी घटले आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच राज्य सरकारला ३०० कोटी रुपयांचा महसूल गमवावा लागला आहे.
औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींमध्ये मद्य आणि बीअरनिर्मिती करणारे १२ कारखाने आहेत. यंदा संपूर्ण मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) या कारखान्यांना मद्य व बीअरनिर्मितीसाठी दररोज ४० लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जात होता. लातूर शहराची दोन दिवसांची तहान भागविणाऱ्या पाण्याची या कारखान्यांकडून एका दिवसात नासाडी केली जात होती. विशेष म्हणजे अवघ्या १६ रुपयांत एक हजार लिटर या दराने त्यांना पाणीपुरवठा केला जात होता. ‘लोकमत’ने यावर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका ७ एप्रिलपासून प्रकाशित केल्यानंतर राज्यभर पडसाद उमटले. याप्रकरणी न्यायालयातही याचिका दाखल झाल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २७ एप्रिलपासून मद्यनिर्मिती कारखान्यांसाठी ६० टक्के पाणी कपात लागू केली.