औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019 : खैरे पर्व संपले; चुरशीच्या लढतीत जलील यांचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:03 PM2019-05-23T21:03:29+5:302019-05-23T21:08:44+5:30
विजयानंतर जलील यांनी नागरिकांना बदल हवा होता, सर्वाना सोबत घेऊन मतदार संघाच्या विकास करण्याचे काम करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
औरंगाबाद : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या औरंगाबाद मतदारसंघातील चौरंगी लढतीत वंचित बहुजन आघाडी - एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी बाजी मारली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये खैरे यांनी जोरदार मुसंडी मारत आघाडी मिळवली होती. मात्र, शेवटी जलील यांनी विजय खेचून आणला.
मतमोजणीत अगदी सुरुवातीपासूनच जलील यांनी आघाडी राखली. विशेष म्हणजे १७ व्या फेरीपर्यंत लढत जलील आणि जाधव अशीच राहिली, खैरे थेट तिसऱ्या क्रमांकावर गेले तर झांबड शेवटपर्यंत चौथ्या क्रमांकावर राहिले. १८ व्या फेरीनंतर खैरे यांची मते वाढत गेली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आले. तर २१ व्या फेरीअखेर खैरे यांनी जोरदार मुसंडी मारत जलील यांच्यावर ७०० मतांची आघाडी घेतली. कधी खैरे पुढे तर कधी जलील असे होत शेवटच्या पाच फेऱ्या अगदी T२० सामन्यांसारख्या झाल्या. शेवटच्या दोन फेऱ्यात जलील यांनी निर्णायक आघाडी घेत विजय खेचून आणला. या विजयासह औरंगाबादमधील खैरे यांचे मागील चार टर्मपासून सुरु पर्व संपले
मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहरावर मागील चारही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. यावेळच्या निवडणुकीत मात्र शिवसेनेला प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतरही या मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानानंतर झालेल्या आरोप- प्रत्यारोपामुळेही ही निवडणूक गाजली. कॉंग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. तर वंचित आघाडीने या मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार देऊन वेगळा प्रयोग केला. तसेच शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांनी उडी घेत आणखी चुरस वाढवली. विजयानंतर जलील यांनी नागरिकांना बदल हवा होता, सर्वाना सोबत घेऊन मतदार संघाच्या विकास करण्याचे काम करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मतदारसंघः औरंगाबाद
विजयी उमेदवाराचे नावः इम्तियाज जलील
पक्षः एमआयएम- वंचित बहुजन आघाडी
मतंः 388373
पराभूत उमेदवाराचे नावः चंद्रकांत खैरे
पक्षः शिवसेना
मतंः 383186
पराभूत उमेदवाराचे नावः हर्षवर्धन जाधव
पक्षः शिव स्वराज्य बहुजन पक्ष
मतंः 282547
पराभूत उमेदवाराचे नावः सुभाष झांबड
पक्षः कॉंग्रेस
मतंः 91401
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८,८६,२९४ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.२ टक्के मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने चौथ्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांना मैदानात उतरविले होत. खैरे यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता.