विजयी उमेदवारांना लागले सरपंच पदाचे डोहाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:05 AM2021-01-22T04:05:47+5:302021-01-22T04:05:47+5:30
निवडणुकीनंतर पुन्हा नवीन आरक्षण काढण्यात येणार असल्याने सरपंचपदाचे स्वप्न पाहणारे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सरपंचपदाच्या आरक्षणाची ...
निवडणुकीनंतर पुन्हा नवीन आरक्षण काढण्यात येणार असल्याने सरपंचपदाचे स्वप्न पाहणारे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सरपंचपदाच्या आरक्षणाची उत्सुकता नवनिर्वाचित सदस्यांसह संपूर्ण गावाला लागली आहे. सरपंच पदाची आरक्षण सोडत बाकी असल्याने सरपंच कोण होणार? याची शाश्वती नसल्याने विजयी उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढलेली दिसत आहे. सरपंचपदाचे आरक्षण कोणत्या संवर्गासाठी सुटेल? या प्रश्नामध्ये निवडून आलेल्या सदस्यांची व मतदारांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. त्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. सदस्यांची फोडाफोडी होणार? की नाही, या प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी सुटेल? या विचाराने सरपंच पदाचे स्वप्न पाहणाऱ्या विजयी उमेदवारांची झोप गायब झाली आहे. गावावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी पहिली लढाई पूर्ण झाली असली; तरी खरी लढाई मात्र सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीनंतर रंगणार आहे. आरक्षण सोडतीनंतर सदस्यांची फोडाफोडी होण्याची दाट शक्यता असते; पण विशाल खोसरे यांची एकहाती सत्ता आल्याने तो प्रश्नच राहत नाही.
बदलाचा नेमका फायदा कुणाला
युती सरकारच्या कालावधीत सरपंच हा थेट जनतेतून निवडला जात असे. मात्र, युतीचे सरकार गेल्यानंतर आघाडीचे सरकार आल्यानंतर यात बदल करून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंच निवडण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. त्याचे ग्रामीण जनतेने स्वागत केले असून, यामध्ये अनेक इच्छुकांना संधी मिळेल, असा विश्वास देखील नागरिकांनी व्यक्त केला होता. या नवीन बदलाचा नेमका फायदा कोणाला होणार, गावाची सत्ता नेमकी कोणाच्या हातात येणार, हे येणारा काळच ठरवेल.