ऐन हिवाळ्यात शहराची तहान १८ एमएलडीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 05:31 PM2018-12-10T17:31:00+5:302018-12-10T17:34:09+5:30

उन्हाळा सुरू होण्यास अजून बराच अवकाश असला तरी शहरात पाण्याची आतापासूनच मागणी वाढली आहे.

In winter, the thirst for the city grew by 18 MLD | ऐन हिवाळ्यात शहराची तहान १८ एमएलडीने वाढली

ऐन हिवाळ्यात शहराची तहान १८ एमएलडीने वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देनगरसेवकांकडून दबावतंत्राचा अवलंब;मनपा कर्मचाऱ्यांना धमक्या पाणीपुरवठा विभागात नोकरी नको म्हणण्याची कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वेळ 

औरंगाबाद : उन्हाळा सुरू होण्यास अजून बराच अवकाश असला तरी शहरात पाण्याची आतापासूनच मागणी वाढली आहे. एकीकडे विविध शासकीय कार्यालयांनी मनपाकडे पाण्यासाठी केलेली मागणी थक्क करणारी आहे. 
दुसरीकडे वॉर्डात नवीन जलवाहिन्यांना जोडणी द्या म्हणून लोकप्रतिनिधींचे दबावतंत्र सुरू झाले असून, महापालिका पाणीपुरवठा विभाग संकटात सापडला आहे. या विभागात नोकरीच नको, अशी अधिकारी व कर्मचारी मागणी करीत आहेत.

घाटीला हवे १५ लाख लिटर पाणी
घाटी रुग्णालयात अद्ययावत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. तब्बल १५० कोटी रुपये खर्च करून हे रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. स्वतंत्र विद्युत ट्रान्स्फॉर्मर आणि पाण्यासाठी उद्घाटन रखडले आहे. घाटी रुग्णालयाने महापालिकेकडे तब्बल १५ लाख लिटर दररोज पाण्याची मागणी केली आहे. दीड एमएलडी पाणी दररोज घाटीला कोठून द्यावे हा सर्वात मोठा प्रश्न महापालिकेला भेडसावतो. पाणी न दिल्यास १०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर पाणी फेरण्याची वेळ येईल. डेंटल आणि कॅन्सर हॉस्पिटलला दररोज पाणी  देण्यात येत आहे. त्यांनाही अतिरिक्त पाणी हवे आहे.

पोलीस आयुक्तालयाला ५ लाख लिटर
पोलीस आयुक्तालयाची नवीन अद्ययावत इमारत अलीकडेच बांधण्यात आली आहे. या इमारतीसह कर्मचारी निवासस्थानांसाठी दररोज ५ लाख लिटर पाण्याची मागणी मनपाकडे आली आहे. सध्या मनपाकडून देण्यात येणारे पाणी कमी पडत आहे. ०.५ एमएलडी अतिरिक्त पाणी द्यावे, अशी मागणी मनपाकडे करण्यात आली आहे. हे पाणी द्यायचे म्हटले तर ज्युबिली पार्क पाण्याच्या टाकीवर ताण वाढणार आहे.

चिकलठाणा रुग्णालयाला हवे पाणी
चिकलठाण्यात २०० खाटांचे अद्ययावत सिव्हिल हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला दररोज १ एमएलडी पाणी हवे. महापालिकेने फक्त २ इंचाचे नळ दिले आहेत. या पाण्यावर रुग्णालयाचे कामकाज अत्यंत अवघड आहे. हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागल्याने पाण्याची मागणीही झपाट्याने वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळाची वाढली तहान
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज किमान ५ विमाने ये-जा करतात. शेकडो प्रवासी त्यात असतात. विमानतळाला मागील काही वर्षांपासून पाणी कमी पडत आहे. मनपाने विमानतळाला फक्त ४ इंचाचे एक नळ कनेक्शन दिले आहे. दररोज २५ हजार लिटर पाण्याची किमान गरज पडते. मनपाने किमान ८ इंचाचे कनेक्शन तरी द्यावे, असे विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे आहे.

वॉर्डांमधील ५० लाईन
समांतर जलवाहिनीच्या कंपनीने शहरातील ३० पेक्षा अधिक वॉर्डांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकून ठेवल्या आहेत. या जलवाहिन्यांना जोडणी द्या म्हणून नगरसेवक मनपा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकत आहेत. मनपा निवडणुका आता १४ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांकडून धमकीसत्रही सुरू झाले आहे.

१८ एमएलडीची मागणी वाढली 
जायकवाडीहून दररोज १३० ते १३५ एमएलडी पाणी शहरात येते.या पाण्यावर शहरातील ११५ वॉर्डांमधील नागरिकांची तहान भागत आहे. मनपाकडे आता १८ एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. मनपाने पाणी न दिल्यास मोठे शासकीय प्रकल्प रखडण्याच्या मार्गावर आहेत. मनपाकडे सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यातून १८ एमएलडी पाणी दिल्यास शहराचा पाणीपुरवठा आठ दिवसांतून एकदा होईल.जायकवाडीहून स्वतंत्र जलवाहिनी टाकून पाणी आणण्याचे सध्या तरी मनपाकडे कोणतेच नियोजन नाही.दोन ते तीन वर्षे शहरात वाढीव पाणी येण्याची शक्यताही नाही. उपलब्ध पाण्यातून मनपाला वाट काढावी लागणार आहे.

Web Title: In winter, the thirst for the city grew by 18 MLD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.