डायन महागाई; तूर, मुगडाळ पुन्हा शंभरीच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:10 PM2021-02-10T13:10:39+5:302021-02-10T13:13:09+5:30
आयात कमी झाल्याने व मागणी वाढत असल्याने डाळीचे भाव वधारल्या
औरंगाबाद : ग्राहक जेव्हा दुकानदारांकडून तूर डाळीचा भाव ऐकतात तेव्हा त्यांचे डोळे पांढरे होत आहेत. कारण, तूरडाळीचे भाव पुन्हा एकदा शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीचे परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने दिसायला लागले आहेत.
तूरडाळीच्या भावात ७०० ते ८०० रुपये वाढ होऊन सध्या ९२०० ते ९५०० रुपये क्विंटल विकते आहे तर किरकोळ विक्रीत ९५ ते ९८ रुपये किलोने तूरडाळ ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे.
तूरडाळीपाठोपाठ मूगडाळचे भाव २०० ते ३०० रुपयांनी वधारून ९००० ते ९५०० रुपये क्विंटल विकत आहे. ही डाळ ९४ ते ९७ रुपये किलोने विकत आहे. या दोन्ही डाळी महागल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत.
उडीद डाळही ८००० ते ८५०० रुपये तर मसूरडाळ ७००० ते ७५०० रुपये क्विंटल विकली जात आहे.
ग्राहकांना थोडा दिलासा म्हणजे सर्वाधिक विक्री होणाऱ्या हरभराडाळीचे भाव ५२०० ते ५५०० रुपयांवर स्थिर आहेत.
आयात कमी झाल्याने व मागणी वाढत असल्याने डाळीचे भाव वधारल्याचे होलसेल व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले. या डाळी महागल्याने महिन्याचे बजेट बिघडल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करत आहे.
व्यापाऱ्यांचाच फायदा
तुरीचा हमीभाव ६००० रुपये आहे. ७० टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर ५००० ते ५५०० रुपये प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांना विकली. आता मोठे व्यापारी, कंपन्यांकडे तुरीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. आता तूर ६९०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. हमीभावापेक्षा जास्त किमतीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा मोठ्या व्यापाऱ्यांनाच होत आहे.
- हरिष पवार, अडत व्यापारी