पन्नास रुपयांच्या भांडवलातून ‘नवदुर्गा’ने आयुष्य बदलले, केटरिंग व्यवसायात बसवला जम
By मुजीब देवणीकर | Published: October 18, 2023 06:02 PM2023-10-18T18:02:36+5:302023-10-18T18:03:50+5:30
कर्तृत्त्वाचे नऊ रंग : घाटी रुग्णालयासह शाळेत जाऊन विकल्या चकल्या,फराळ
छत्रपती संभाजीनगर : घरातून फक्त ५० रुपयांचे भांडवल घेऊन घाटी रुग्णालयाच्या परिसरात रुग्णांच्या नातेवाइकांना चकल्या, फराळ विकला. घरी जेवणाचे डबे तयार करून डॉक्टरांना दिले. सुगरण ‘नवदुर्गे’च्या हाताला चव असल्याने मागणी वाढू लागली. हळूहळू स्वत:चा केटरिंग व्यवसाय सुरू केला. मुलांना उच्च शिक्षण दिले. पुढील शिक्षणासाठी लंडनला पाठविले. शहरात निराला बाजार भागात एक हॉटेलसुद्धा सुरू केले. हा सर्व चमत्कार करणाऱ्या नवदुर्गेचे नाव आहे नीलिमा गजानन बोडखे.
अमरावती येथील नीलिमा यांचे लग्न १९९३ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जलम येथील गजानन बोडखे यांच्यासोबत झाले. बोडखे छत्रपती संभाजीनगर शहरात एलएलबीचे शिक्षण घेत होते. शिक्षणानंतर त्यांनी ‘प्रॅक्टिस’ न करता एका कुरिअरमध्ये नोकरी स्वीकारली. टाऊन हॉल भागातील प्रगती कॉलनी येथे भाड्याच्या घरात सुखाचा संसार सुरू होता. वैभव, ऋषिकेश ही दोन मुले झाली. कुरिअरच्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण होता. मनात आपण काही तरी करावे, हा विचार सुरू होता. घाटीत रुग्ण असलेल्या नातेवाइक महिलेला त्या भेटायला गेल्या. तेथे एक महिला विविध साहित्य विकत असल्याचे त्यांनी पाहिले. यापेक्षा दर्जेदार फराळ, चकल्या अन्य पदार्थ आपणही तयार करून विकू शकतो, असे त्यांना वाटले.
५० रुपयांच्या भांडवलावर खाद्यपदार्थ विक्री घाटीत सुरू केली. कुटुंबातून याला कडाडून विरोध झाला. मात्र, त्या डगमगल्या नाहीत. ज्युबिली पार्क येथे एका शाळेतही विक्री सुरू केली. लहान मुले, घाटीतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळू लागला. निवासी डाॅक्टरांनी जेवणाची मागणी केली. त्यांच्यासाठी जेवणाचे डबेही सुरू केले. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांच्या जेवणाच्या ऑर्डर मिळू लागल्या. ताट नसल्याने मैत्रिणीकडून ताट घेऊन एका रिक्षात त्या जात असत. २०१३ पासून गजानन बोडखे यांनीही या व्यवसायाला मदत करण्यास सुरुवात केली. गुरू गणेशनगर येथे स्वत:चे घर उभारले.
मुलांना दिले उच्च शिक्षण
व्यवसायात बऱ्यापैकी जम बसला होता. मोठा मुलगा वैभव बीसीएस झाला. लहान मुलगा ऋषिकेशने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली. मास्टर्स डिग्रीसाठी तो आता लंडनला गेला आहे. आता पाच हजार नागरिकांना जेवण देण्याएवढे मोठे केटरिंग सुरू आहे. मुलाने निराला बाजार येथे एक प्रशस्त हॉटेल थाटले आहे.