औरंगाबादच्या मोरे कुटुंबीयांनी प्राणपणाने जपल्या आहेत बाबासाहेबांच्या अस्थी
By स. सो. खंडाळकर | Published: December 6, 2022 01:17 PM2022-12-06T13:17:32+5:302022-12-06T13:18:35+5:30
''डॉ. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन सर्वांना घेता यावे, हीच आमची इच्छा आहे.''
- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी औरंगाबादच्या मोरे कुटुंबीयांनी प्राणपणाने जपून ठेवल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियोजित संशोधन केंद्र व वस्तुसंग्रहालयात सन्मानपूर्वक या अस्थी ठेवण्याची या कुटुंबीयांची इच्छा आहे. पण ती कधी फलद्रूप होईल, हे मात्र अनिश्चित आहे. कारण तत्कालीन कुलगुरू बी.ए. चोपडे यांनी पुढाकार घेतलेला हा प्रकल्प थंड्या बस्त्यातच आहे. हे संग्रहालय होणार की नाही, संघर्षातून मिळवलेल्या बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठात हे संग्रहालय होणार नसेल तर याला काय म्हणावे, असे सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत. आंबेडकरवादी संघटनांनी त्यात लक्ष घालण्याची गरज आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन सर्वांना घेता यावे, हीच आमची इच्छा आहे. ६ डिसेंबरला या अस्थिदर्शनासाठी परभणीत असतील. ज्ञानमंदिर उभारून तेथून संशोधक व अभ्यासकांनी विद्यार्जन करावे, अशीच वडील भाऊसाहेब मोरे यांची इच्छा होती, असे वरिष्ठ अधिकारी असलेले प्रवीण मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शपथ घेतली होती.....
६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे दिल्लीत निधन झाले. १९५६ साली ९ डिसेंबरला अहमदनगर येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. यावेळी बाबासाहेबांचे प्रमुख अनुयायी उपस्थित होते. ‘समाज एकसंध ठेवू, विभक्त होऊ देणार नाही, फूट पडू देणार नाही, बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहू’ अशी शपथ घेण्यात आली होती.
मंडळाने अस्थी सुपूर्द केल्या होत्या......
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मंडळ नेमण्यात आले. मखमली कापडात गुंडाळलेल्या बाबासाहेबांच्या अस्थी फेडरेशनच्या सर्व प्रांताध्यक्षांना सुपूर्द करण्यात आल्या. यात मराठवाड्याचे प्रांताध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नाशिकचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, मुंबई प्रांताचे अध्यक्ष बी. सी. कांबळे, अहमदनगरचे अध्यक्ष दादासाहेब रोहम, नागपूर- चंद्रपूर-भंडाऱ्याचे बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, पुण्याचे पी. एन. राजभोज, साताऱ्याचे प्रांताध्यक्ष आर. डी. भांगरे, बी. पी. मौर्य यांना या अस्थी सोपविण्यात आल्या होत्या. या सर्वांनी या अस्थी जिवापाड जपल्या.
‘जय भीम’चा नारा.....
भाऊसाहेब मोरे यांनी तर कन्नडच्या मकरणपूर येथे त्या काळात बाबासाहेबांच्या सभेेचे नियोजन केले होते व तेथे ‘ जय भीम’चा नारा बुलंद केला होता. आज हा नारा किती जिवाभावाचा झाला आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.