विश्वास असेपर्यंत तुमच्या सोबत, अन्यथा मार्ग मोकळा; अब्दुल सत्तारांचा शिंदेंना सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:03 IST2025-01-02T16:01:46+5:302025-01-02T16:03:22+5:30
मंत्री संजय शिरसाट यांनाही सत्तार यांनी दिले जोरदार प्रत्युत्तर

विश्वास असेपर्यंत तुमच्या सोबत, अन्यथा मार्ग मोकळा; अब्दुल सत्तारांचा शिंदेंना सूचक इशारा
छत्रपती संभाजीनगर : मंत्रीमंडळात डावलण्यात आल्यामुळे नाराज असलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नववर्षाच्या पहिल्या दिनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपण लोकनेते असल्याचे दाखवून दिले. शिवाय, माझ्यावर तुमचा विश्वास असेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. विश्वास संपला की मार्ग मोकळा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सूचक इशाराही त्यांनी दिला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा माझ्यावर विश्वास आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या एकसष्टीनिमित्त येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या अभीष्टचिंतन आणि नागरी सत्कार सोहळ्यात या मैदानावरील आजवरचा गर्दीचा विक्रम मोडला गेला. जिल्हाभरातून सत्तार समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी सत्काराला उत्तर देताना आ. सत्तार यांनी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “मी मंत्रिपदावर नसतानादेखील लोकांनी प्रेमापोटी एवढी गर्दी केली आहे. मी सदैव जनतेच्या सेवेत राहणारा माणूस आहे. राजकारणात पुढे काय होईल, ते सांगता येणार नाही. मी काय निर्णय घेणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. काही जण सिल्लोडला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यांनी आम्हाला विरोध केला, लोकांनी त्यांनाच घरी बसविले,” असा टोला त्यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. यावेळी खा. कल्याण काळे, डॉ. दिनेश परदेशी, माजी आ. सुरेश जेथलिया, कृष्णा पाटील डोणगावकर, राधाकिसन पठाडे, रामूकाका शेळके, बाळासाहेब संचेती, अभिजित देशमुख, सुधाकर सोनवणे, संतोष कोल्हे, अविनाश गलांडे, नंदकिशोर सहारे, भाऊसाहेब ठोंबरे आदींची उपस्थिती होती.
शिंदेसेनेचे आमदार अनुपस्थित!
जिल्ह्यात शिंदेसेनेचे सहा आमदार आहेत. मात्र, आमदार सत्तार यांच्या नागरी सत्काराला एक जणही उपस्थित नव्हता. उलट भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व इतर पक्षातील नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
मंत्री शिरसाट यांना दिले उत्तर..
सिल्लोडमधील गुंडगिरी संपविण्याचा इशारा देणारे मंत्री संजय शिरसाट यांनाही सत्तार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “सिल्लोडला काय येता? मीच छत्रपती संभाजीनगरमध्ये येतोय. इथली गुंडगिरी कशी थांबवायची ते आधी पाहू. त्यांचे वक्तव्य म्हणजे, नाल्याच्या पाण्याचा खळखळाट आहे. आम्ही समुद्रासम आहोत!”
मी पुन्हा येईन...
आमच्या नेत्याने (शिंदेंनी) सर्वांना सांगितले आहे की, अडीच-अडीच वर्ष मंत्रिपद राहील. त्यामुळे मलाही अडीच वर्षे थांबावे लागेल. अडीच वर्षांनंतर काय होईल, मला माहिती नाही. राजकारणात आश्वासन पूर्ण होत नसते. पण, काहीही करून मी पुन्हा येईन!