१५७५ शिक्षकांना वेतनश्रेणी परत करण्याच्या नोटिसा परत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:04 AM2021-06-27T04:04:57+5:302021-06-27T04:04:57+5:30
औरंगाबाद : जिल्हाभरातील १५७५ पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी परत करण्याच्या दिलेल्या नोटिसा मागे घ्या, अन्यथा धरणे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य ...
औरंगाबाद : जिल्हाभरातील १५७५ पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी परत करण्याच्या दिलेल्या नोटिसा मागे घ्या, अन्यथा धरणे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने दिला आहे, तर शिक्षकांना विनाकारण वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप शिक्षक सेनेकडून करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शाळेवरील २१४७ शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी दिली. मागील आठवड्यात १५७५ शिक्षकांना नोटीस पाठवून आपली वेतनश्रेणी परत घ्यायची आहे यासाठी विकल्प भरून द्यावा, अशा सूचना केल्या. शिक्षकांना वेतनश्रेणी जिल्हा परिषदेने त्यांच्या मर्जीने दिली होती. २०१४ला ११०० प्राथमिक शिक्षकांचे प्रमोशन करून त्यांना प्राथमिक पदवीधर वेतनश्रेणी दिली गेली होती.
शिक्षणाचा हक्क कायद्यात ६ ते ८ या वर्गासाठी प्रत्येक विषयाला एक शिक्षक, असा नियम असल्यामुळे या शिक्षकांना पदवीधर पदोन्नती देऊन वेतनश्रेणी दिली गेली होती. मात्र, या शिक्षकांची वेतनश्रेणी परत घेण्यासाठी शिक्षण विभागाने नोटीस पाठवलेली आहे. त्या परत घ्या अन्यथा जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करू, असा इशारा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रंजीत राठोड, नितीन नवले, श्याम राजपूत आदींनी दिला आहे.
---
विनाकारण वेठीस धरले जातेय
जिल्हा परिषद प्रशासनाकडून दीड हजार शिक्षकांना नोटिसा बजावून वेतनश्रेणी काढून अदा झालेली त्या श्रेणीची रक्कम का वसूल करण्यात येऊ नये, अशा कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची अधिकारी दिशाभूल करत असून, विनाकारण शिक्षकांना वेठीस धरत असल्याचा आरोप शिक्षक सेनेकडून प्रभाकर पवार, दीपक पवार, महेश लबडे, अमोल एरंडे यांनी केला आहे.