तक्रार मागे घे! बलात्कार पीडितेच्या घरात घुसून आरोपींचा हल्ला
By राम शिनगारे | Published: September 24, 2022 07:54 PM2022-09-24T19:54:30+5:302022-09-24T19:54:56+5:30
सातारा ठाण्यात गुन्हा दाखल : तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यासाठी आयुक्तांना निवेदन
औरंगाबाद : दिरानेच अत्याचार केल्यानंतर पीडितेने सातारा पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदवला. ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी पीडितेच्या घरात घुसून तिच्यासह आई-वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला असून, पीडितेने पोलीस आयुक्तांकडे तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे.
सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका पीडितेवर तिच्याच दिराने अत्याचार केले. ही माहिती पतीसह शिक्षिका असलेल्या सासूला देण्यात आली; पण दोघांनी पीडितेलाच दोष दिला. पीडितेने २६ डिसेंबर २०२० रोजी दिरासह त्यास मदत करणाऱ्या पतीच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यानंतर पती, दीर आणि सासू सातारा हद्दीतील घर सोडून टाइम्स कॉलनी, कटकट गेट परिसरात राहण्यास गेले. पीडिता सातारा हद्दीतील घरीच राहते. या गुन्ह्यात आरोपींना जामीन मिळाल्यानंतर पीडितेला त्रास देणे सुरूच ठेवले. ८ मार्च २०२१ रोजी महिला दिनीच पीडितेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्नही आरोपींनी केला होता. यानंतरही आरोपींनी ठिकठिकाणी मारहाण केल्याचे छावणी, सातारा, सिटी चौक पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे नोंद आहेत.
२० सप्टेंबर रोजी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींनी पीडितेच्या घरात घुसून तिच्यासह मुलगा, आई- वडिलांना बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी पीडितेचे दागिने, रोख रकमेसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून नेला. पीडिता पोलीस ठाण्यात गेल्यानंतर बुधवारी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे सातारा पोलिसांनी आरोपी कटकट गेट परिसरात राहत असताना त्यांचा आणि पीडितेच्या घराचा एकच पत्ता एफआयआरमध्ये नोंदवल्याचा आक्षेपही पीडितेने घेतला आहे. आरोपींना सातारा पोलिसांची मदत होत असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणीही पीडितेने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जामीन रद्द करण्याची मागणी
आरोपींना न्यायालयाने विविध अटी, शर्ती घालून अत्याचाराच्या प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे. या अटींचे उल्लंघन आरोपींकडून सतत होत आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणीही निवेदनात आहे.