विद्यापीठ प्रशासनाची माघार; प्राध्यापकांना पीएच.डी. गाईडशिप, संशोधन केंद्र पुन्हा मिळणार

By राम शिनगारे | Published: July 25, 2024 12:27 PM2024-07-25T12:27:58+5:302024-07-25T12:29:19+5:30

प्राध्यापक, विद्यार्थी संघटनांच्या दबावामुळे अध्यादेशात बदल

withdrawal of BAMU university administration; Professors have Ph.D. Guidance, research center will be available again | विद्यापीठ प्रशासनाची माघार; प्राध्यापकांना पीएच.डी. गाईडशिप, संशोधन केंद्र पुन्हा मिळणार

विद्यापीठ प्रशासनाची माघार; प्राध्यापकांना पीएच.डी. गाईडशिप, संशोधन केंद्र पुन्हा मिळणार

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यूजीसीच्या परिपत्रकाच्या अंमलबजावणीसाठी संलग्न महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मान्यता असलेल्या प्राध्यापकांनाच पीएच.डी.ची गाईडशिप आणि संशोधन केंद्र कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यात प्राध्यापक, विद्यार्थी संघटनांच्या दबावामुळे बदल केला आहे. संबंधितांची गाईडशिप व संशाेधन केंद्र पीएच.डी. परिनियमात बदल करीत पुन्हा बहाल केले आहेत.

विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेश प्रवेशासाठी ‘पेट’ची घोषणा केल्यानंतर संलग्न महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची कायमस्वरूपी मान्यता असलेले प्राध्यापकच पीएच.डी.चे गाईड राहतील. तसेच ज्या संशोधन केंद्रात दोनपेक्षा अधिक पदव्युत्तरचे प्राध्यापक असतील तरच संशोधन केंद्र कायम ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्याचा परिणाम तब्बल १ हजार ५६८ प्राध्यापकांची गाईडशिप जाणार होती. त्याचवेळी १७० संशोधन केंद्रांना टाळे लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. या निर्णयामुळे संशोधनावर मोठा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले. 

या निर्णयाच्या विरोधात बामुक्टो, बामुक्टा, स्वाभिमानी मुप्टा या प्राध्यापकांच्या संघटनांसह सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची भेट घेत प्रखर विरोध दर्शविला होता. तसेच इतर विद्यापीठांनी घेतलेल्या निर्णयानुसार यूजीसीच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. या संघटनांच्या रेट्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने पीएच.डी.च्या अध्यादेशामध्ये (ऑर्डिनन्स) बदल केले आहे. त्यानुसार ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. त्या महाविद्यालयातील पीजीचे प्राध्यापक आणि पदवी वर्गाला शिकविणारा व विद्यापीठाच्या विहित प्रक्रियेने पीजी रिकॉग्नाईझड प्राध्यापक असलेले शिक्षक पीएच.डी.चे गाईड म्हणून मान्यता कायम राहणार आहे. त्याचवेळी संशोधन केंद्राच्या बाबतीतही हाच नियम लागू केला आहे. त्यामुळे बहुतांश प्राध्यापकांची गाईडशिप आणि संशोधन केंद्र कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

शिष्यवृत्तीधारकांचा पीएच.डी.ला प्रवेश
विद्यापीठात एम.फिलचे संशोधन करीत असताना भारत किंवा राज्य शासनाच्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत शिष्यवृत्ती मिळालेली असेल तर अशा संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी.ची नोंदणी होण्यासाठी त्रिसदस्यीय समितीद्वारे डीआरसी आणि आरआरसीच्या माध्यमातून प्रकरणे मान्य करण्यात येणार आहेत.

सेट, नेट, एम.फिलधारकांना थेट प्रवेश
एम.फिल., सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशासाठी पेटमधून सूट देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने पेट-२०२४ मध्ये नोंदणी करणे अनिवार्य असल्याचेही परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Web Title: withdrawal of BAMU university administration; Professors have Ph.D. Guidance, research center will be available again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.