कृषिमंत्र्यांच्या समर्थक उमेदवाराची माघार; विद्यापीठातील विद्या परिषदेसाठी निवडणूक

By राम शिनगारे | Published: September 26, 2023 12:22 PM2023-09-26T12:22:47+5:302023-09-26T12:23:09+5:30

विद्या परिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर दोन सदस्य पाठविण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.

Withdrawal of supporting candidate for Agriculture Minister Dhananjay Munde; 4 candidates for 2 seats of Vidya Parishad in the Dr,BAMU | कृषिमंत्र्यांच्या समर्थक उमेदवाराची माघार; विद्यापीठातील विद्या परिषदेसाठी निवडणूक

कृषिमंत्र्यांच्या समर्थक उमेदवाराची माघार; विद्यापीठातील विद्या परिषदेसाठी निवडणूक

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्या परिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर पाठवायच्या दोन सदस्यांसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक ‘उत्कर्ष’ आणि भाजप समर्थक विद्यापीठ विकास मंचमध्ये थेट लढत होणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ‘उत्कर्ष’मधील समर्थक उमेदवारासाठी उच्चशिक्षण मंत्र्यांसह भाजपच्या अनेकांशी संपर्क साधत युती करण्याची मागणी केली. मात्र, त्यास शेवटपर्यंत भाजपकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्येच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

विद्या परिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर दोन सदस्य पाठविण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी विद्यापीठ विकास मंचकडून पुरुष गटात डॉ. व्यंकटेश लांब, तर ‘उत्कर्ष’कडून मुंडे यांचे समर्थक डॉ. पी. एल. कराड यांच्यासह डॉ. राजेश लहाने यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. महिला गटात ‘उत्कर्ष’कडून डॉ. रेखा गुळवे आणि मंचकडून डॉ. अपर्णा पाटील यांची उमेदवारी दाखल झाली. विद्या परिषदेत मंचचे वर्चस्व असल्यामुळे मुंडे यांनी परळीतील समर्थक उमेदवार डॉ. कराड यांना पुरुष गटातून, तर महिला गटातून मंचच्या डॉ. पाटील यांना बिनविरोध निवडून द्यावे, अशी मागणी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे चार दिवसांपूर्वी मुंबईत केली होती. त्यास उच्च शिक्षणमंत्री पाटील यांनी सकारात्मकता दर्शवली. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळे मुंडे यांनी परळीमध्ये पोहोचताच पुन्हा मंत्री पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मुंडे यांनी मंचचे विद्यापीठ स्तरावर काम पाहणाऱ्यांकडे एक-एक जागा घेऊ, अशी मागणी केली. त्यानंतरही मंचकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी मुंडे समर्थक डॉ. कराड यांनी उमेदवारी अर्जच मागे घेतला. या घडामोडीमुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीला अद्यापही भाजप संबंधित वेगवेगळ्या सेलसोबत घेण्यास तयार नसल्याचेच दिसले. स्थानिक कार्यकर्त्यांनी दोन्ही जागा लढविण्याचा आग्रह केल्यामुळे युती होऊ शकली नाही, अशी माहिती मंचचे निमंत्रक डॉ. सर्जेराव जिगे पाटील यांनी दिली.

लांब, पाटील यांच्या विजयाची शक्यता
मंचचे उमेदवार डॉ. व्यंकटेश लांब व डॉ. अपर्णा पाटील यांच्या विजयाची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळेच मंचकडून सत्ताधारी ‘उत्कर्ष’सोबत तडजोड करण्यास नकार दिला. निवडणुकीत ६० मतदार असून, त्यात मंच समर्थक सर्वाधिक आहेत. मात्र, तरीही ‘उत्कर्ष’कडून विजयासाठी प्रयत्न केल्यास धक्कादायक निकालही लागू शकतो.

Web Title: Withdrawal of supporting candidate for Agriculture Minister Dhananjay Munde; 4 candidates for 2 seats of Vidya Parishad in the Dr,BAMU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.