उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
By सुमेध उघडे | Published: October 28, 2024 07:07 PM2024-10-28T19:07:22+5:302024-10-28T19:08:51+5:30
ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतलेल्या किशनचंद तनवाणी यांना पक्षाच्या सर्व पदातून मुक्त करत असल्याचे अंबादास दानवे यांनी जाहीर केले.
छत्रपती संभाजीनगर: उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असताना उद्धवसेनेच्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणूक न लढण्याचे जाहीर केले. यामुळे उद्धव सेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या मतदारसंघासाठी उद्धवसेनेने बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी दिल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.
शहरातील मध्य मतदारसंघामध्ये शिंदेसेनेकडून आमदार प्रदीप जैस्वाल यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. तर ठाकरे सेनेकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली. मात्र आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन तनवाणी यांनी अचानक निवडणूक न लढण्याचे जाहीर केले. या धक्क्यातून सावरत उद्धवसेनेने तत्काळ दूसरा उमेदवार घोषित केला. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद मध्य मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर केली. थोरात हे छत्रपती संभाजीनगर मध्यचे शहरप्रमुख असून माजी नगरसेवक आहेत.
तनवाणी यांना केले पदमुक्त
ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतलेल्या किशनचंद तनवाणी यांना पक्षाच्या सर्व पदातून मुक्त करत असल्याचे यावेळी दानवे यांनी जाहीर केले.
तनवाणी काय नेमंक म्हणाले
प्रदीप जैस्वाल आणि किशनचंद तनवाणी हे दोघेही कट्टर शिवसैनिक आणि बालमित्र आहेत. यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष लागले होते. दोघेही २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते. यावेळी मत विभागणी होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. त्यानंतर सन २०१९ मध्ये जैस्वाल यांनी २०२४ च्या निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. मात्र, आता मी दोन वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो. परंतु ते पाठिंबा देण्यास तयार नाहीत. तसेच आता २०१४ सारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा उद्धव सेनेचे उमेदवार तनवाणी यांनी केली.