महिनाभरात विद्यापीठाचा पाहिला कोपरानकोपरा, दीर्घकालीन ॲक्शन प्लान तयार: कुलगुरू फुलारी

By राम शिनगारे | Published: February 29, 2024 12:15 PM2024-02-29T12:15:21+5:302024-02-29T12:15:21+5:30

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारला त्यास महिना पूर्ण झाल्यामुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Within a month, I saw every corner of the university; Long term action plan ready: Vice Chancellor Vijay Phulari | महिनाभरात विद्यापीठाचा पाहिला कोपरानकोपरा, दीर्घकालीन ॲक्शन प्लान तयार: कुलगुरू फुलारी

महिनाभरात विद्यापीठाचा पाहिला कोपरानकोपरा, दीर्घकालीन ॲक्शन प्लान तयार: कुलगुरू फुलारी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरात हजारो फायली निकाली काढल्या. सकाळी ६ ते ८ या वेळेत विद्यापीठाची सीमारेषा असलेल्या प्रत्येक भागाला भेट देत पाहणी केली. त्याशिवाय विद्यापीठातील १०० टक्के विभागात जाऊन आढावा घेतला. विभागातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची स्वच्छता प्रत्यक्ष पाहून संबंधितांना दुरुस्तीसाठीच्या सूचना केल्या. या सर्व महिनाभरातील अभ्यासानुसार विद्यापीठाच्या विकासाचा दीर्घकालीन ॲक्शन प्लान तयार करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारला त्यास महिना पूर्ण झाल्यामुळे प्रसारमाध्यमांशी मंगळवारी सायंकाळी संवाद साधला. यावेळी प्रकुलगुरू डाॅ. वाल्मीक सरवदे, प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांच्यासह अधिष्ठाता, वित्त व लेखाधिकारी यांची उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. फुलारी म्हणाले, पदभार घेतला तेव्हा सुरुवातीच्या दोन दिवसांत तब्बल १६०० पेक्षा अधिक फायली प्रलंबित होत्या. सकाळी ९ ते रात्री ६:३० यावेळेत सर्व फायली निकाली काढल्या. दुपारी केवळ अर्धा ते पाऊस तासच सुटी घेण्यात येत आहे. स्वत: कुलगुरूच वेळेवर हजर राहत असल्यामुळे प्रकुलगुरू, अधिष्ठातांनाही त्यापूर्वीच हजर राहावे लागते. त्यानुसार सर्वत्र शिस्त लावण्याचे काम सुरू केले आहे. विद्यापीठाच्या सुरक्षेचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत येत आहे. त्यासाठी बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, विद्युत कॉलनी, गुरुगणेशनगर, लेण्या, डोंगर, गोगाबाबा टेकडी, पेठेनगर, नंदनवन कॉलनी सर्व भागांतून आतमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचे निरीक्षण केले. त्यानुसार आगामी काळात सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'नॅक'साठी सर्वोच्च प्राधान्य
विद्यापीठाच्या 'नॅक' मूल्यांकनाची मुदत काही महिन्यांत संपत आहे. त्यापूर्वीच 'नॅक' मूल्यांकनासाठी संपूर्ण तयारी केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच उभारली आहे. त्यानुसार काम करण्यात येत आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे मित्र आहेत. मात्र, त्यांच्याकडून नॅकच्या तयारीकडे दुर्लक्ष झाल्याचेही त्यांनी सांगितले.

कृतीतूनच सर्वांना दिसेल
विद्यापीठाच्या प्रगतीसाठी नुसतीच आश्वासने दिली जाणार नाहीत. ठोस कृती केली जाईल. कृतीतूनच सर्वांना दिसून येईल.
- डॉ. विजय फुलारी, कुलगुरू

Web Title: Within a month, I saw every corner of the university; Long term action plan ready: Vice Chancellor Vijay Phulari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.