‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनात विद्यापीठ शंभरच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 07:11 PM2019-04-09T19:11:14+5:302019-04-09T19:13:38+5:30
विद्यापीठ गटात देशात ८५ वा क्रमांक
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकत्याच झालेल्या ‘मूल्यांकना’त ‘अ’ दर्जा कायम राखत सुधारणा नोंदवली होती. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीत जाहीर केलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’मधील (एनआयआरएफ) विद्यापीठ गटात विद्यापीठाने मोठी झेप घेत ८५ वा क्रमांक पटकावला. मागील वर्षी विद्यापीठाचा समावेश १०१ ते १५० यात झालेला होता.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २०१६ पासून देशभरातील शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनासाठी ‘एनआयआरएफ’ संकल्पना अस्तित्वात आणली. यात सर्व शैक्षणिक संस्थांची एकत्रित यादी जाहीर केली जाते. यानंतर विद्यापीठ, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, विधि, महाविद्यालय, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुशास्त्र आणि वैद्यकीय गटातील संस्थांची स्वतंत्र यादी जाहीर केली जाते. विद्यापीठ गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ८५ वा क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास विद्यापीठातर्फे डॉ. गुलाब खेडकर उपस्थित होते.
शैक्षणिक संस्थांमध्ये १०० च्या बाहेर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला विद्यापीठ या गटात देशात ८५ वा क्रमांक मिळाला असताना देशातील शैक्षणिक संस्था गटात मात्र १०१ ते १५० या गटात स्थान मिळाले आहे. पहिल्या शंभर शैक्षणिक संस्थात राज्य विद्यापीठातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १७ वा क्रमांक पटकावला, तर मुंबई विद्यापीठाला १०१ ते १५० या गटातच स्थान मिळाले. इतर विद्यापीठांचा या गटातही समावेश नाही.
विद्यापीठाने ‘एनआयआरएफ’मध्ये मोठी मजल मारली आहे. नामांकित विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ खूप पुढे आहे. मराठवाड्यातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमुळेच ही रँकिंग मिळाली आहे. - डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू