वीस दिवसांत कोरोनाने पत्नी-पत्नीचा घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:05 AM2021-06-10T04:05:07+5:302021-06-10T04:05:07+5:30
पळशी : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही सर्वाधिक धोकादायक ठरली. या लाटेत अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. मृत्यू ...
पळशी : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही सर्वाधिक धोकादायक ठरली. या लाटेत अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. मृत्यू तांडवाने हृदयाचा थरकाप उडाला होता. असाच धक्कादायक प्रकार सिल्लोड तालुक्यातील पळशी गावात घडला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अवघ्या वीस दिवसांत पती-पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने पळशी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तीन मुलांच्या कुटुंबातील आधारवड गेल्याने कुटुंबाबर दु:खाचे सावट आहे.
पळशी येथील शेषराव गणपत बडक (६०), कस्तुराबाई शेषराव बडक (५४) हे दाम्पत्य राहते. त्यांच्या कुटुंबात तीन मुले, मुली, सुना, नातवंडांचा समावेश आहे. शेषराव बडक व कस्तुराबाई यांच्या गुण्यागोविंदाने सुरू असलेल्या संसाररूपी गाड्याला अचानक कोरोनाने ब्रेक लावला. शेषराव बडक यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १८ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. याचदरम्यान पत्नी कस्तुराबाई बडक यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांची तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावरही औरंगाबादेतील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी (दि.६) जून रोजी कस्तुराबाईंचाही मृत्यू झाला. अवघ्या वीस दिवसांच्या कालावधीत घरातील दोन जणांचा मृत्यू झाल्याने आप्तस्वकीयांना चांगलाच धक्का बसला आहे.
-------
कुटुंबातील सर्वांना केले होते क्वारंटाइन
कोरोनाने एकाच कुटुंबातील दोघांना मृत्यूच्या कवेत घेतल्याने बडक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या वीस दिवसांच्या अंतराने होत्याचे नव्हते झाले. शेषराव बडक यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कुटुंबातील अन्य सदस्यांची तपासणी करण्यात आली. यात अन्य कोणालाही कोरोनाची लागण झालेली नव्हती; परंतु सुरक्षेच्या दृष्टीने कुटुंबातील सर्व सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते.