मराठवाड्याचा विकास सिंचनाशिवाय अशक्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:46 PM2018-03-17T23:46:39+5:302018-03-17T23:46:45+5:30
देशातील, राज्यातील कोणताही एखादा भाग इतरांच्या तुलनेत मागास राहिलेला असेल, तर तो असमतोल कमी करण्यासाठी कृषी क्षेत्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. औद्योगिक असमतोलाच्या अगोदर कृषी क्षेत्रातील असमतोल कमी केल्यास विकासाला चालना मिळते. यासाठी कृषी आणि जलसिंचनाच्या सुविधा वाढविणे गरजेचे असते. यामुळे मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जलसिंचनाशिवाय पर्याय नसल्याचे मत इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च आॅन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशन इन्स्टिट्यूटमधील प्रोफेसर गायत्री मोहन यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशातील, राज्यातील कोणताही एखादा भाग इतरांच्या तुलनेत मागास राहिलेला असेल, तर तो असमतोल कमी करण्यासाठी कृषी क्षेत्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. औद्योगिक असमतोलाच्या अगोदर कृषी क्षेत्रातील असमतोल कमी केल्यास विकासाला चालना मिळते. यासाठी कृषी आणि जलसिंचनाच्या सुविधा वाढविणे गरजेचे असते. यामुळे मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जलसिंचनाशिवाय पर्याय नसल्याचे मत इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च आॅन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशन इन्स्टिट्यूटमधील प्रोफेसर गायत्री मोहन यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या एकत्रित सॅप-२ कार्यक्रमांतर्गत ‘मराठवाड्याचा विकास : संधी आणि आव्हाने’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन जपानमधील कागावा विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. रवींद्र रानडे, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. संजय साळुंके, विभागप्रमुख डॉ. धनश्री महाजन, डॉ. अशोक पवार, डॉ. सुनील नरवडे आदींच्या उपस्थितीत झाले. उद्घाटनानंतरच्या दुसऱ्या सत्रात प्रो. गायत्री मोहन यांनी संशोधन पेपरचे सादरीकरण केले. यात त्यांनी कृषी असमतोलावर भाष्य केले. याच चर्चासत्रात दिल्ली येथील सामाजिक विकास केंद्राच्या डॉ. अनन्या वाजपेयी यांनी सीमांतिक घटकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले. तत्पूर्वी उद्घाटन समारंभात डॉ. रवींद्र रानडे यांनी बीजभाषण केले. यात त्यांनी जपानमधील इतर प्रदेशांच्या तुलनेत मागास असलेल्या भागात शिक्षण आणि अभियांत्रिकी उद्योग यांच्यात समन्वय निर्माण करून प्रगती साध्य केल्याचे सांगितले. हेच मॉडेल अमेरिकासह जगातील इतर प्रगत राष्ट्रांनी स्वीकारल्याचेही डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. वाल्मीक सरवदे यांनीही मनोगत व्यक्त केले. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनश्री महाजन यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी तीन विभागांच्या सहकार्यातून सुरू असलेल्या प्रकल्पासह संशोधनावर प्रकाश टाकला. डॉ. शूजा शाकीर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनल उबाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तिन्ही विभागातील विद्यार्थी, परदेशी संशोधक उपस्थित होते.