आयएएस अधिकाऱ्याविना जलआयुक्तालय कागदावरच
By Admin | Published: May 3, 2017 03:24 AM2017-05-03T03:24:30+5:302017-05-03T03:24:30+5:30
औरंगाबादेतील वाल्मी (जल व भूमी व्यवस्थापन) येथे संपूर्ण राज्यासाठी मृद व जलसंधारण आयुक्तालय १ मे रोजी सुरूकरण्याची घोषणा
विकास राऊत / औरंगाबाद
औरंगाबादेतील वाल्मी (जल व भूमी व्यवस्थापन) येथे संपूर्ण राज्यासाठी मृद व जलसंधारण आयुक्तालय १ मे रोजी सुरूकरण्याची घोषणा आयएएस अधिकारी न मिळाल्यामुळे हवेत विरली. आता आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर त्या आयुक्तालयाच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा होणार आहे.
मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या आयुक्तपदावर भारतीय प्रशासन सेवेतील (अधिकालिक वेतनश्रेणीत) अधिकारी नेमण्याचा निर्णय झाला खरा परंतु अधिकाऱ्याची नेमणूक अद्याप होऊ शकलेली नाही. जल व भू-व्यवस्थापन (वाल्मी) ही जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील प्रशिक्षण संस्था तिच्या स्वायत्ततेला बाधा न आणता मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करून या विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाने २५ एप्रिल रोजी घेतलेल्या बैठकीत मृद व जलसंधारण आयुक्तालय औरंगाबादेत स्थापन करण्यास मान्यता दिली. औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेच्या परिसरात हे आयुक्तालय १ मेपासून सुरूकरण्याचे देखील जाहीर करून टाकले. जलसंधारण विभागाचे नाव बदलून ते मृद व जलसंधारण विभाग केले. जिल्हा परिषदेचा सिंचन विभागही त्या आयुक्तालयात वर्ग होणार आहे. २० अभियंते त्या आयुक्तालयात वर्ग होतील, असे सांगण्यात येत आहे.
लवकरच उद्घाटन
जलसंधारणमंत्री राम शिंदे लोकमतला माहिती देताना सांगितले, की आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे १ मे चा मुहूर्त हुकला. नवीन तारीख ठरलेली नाही; परंतु लवकरच आयुक्तालयाचे उद्घाटन होईल.