मास्क नसेल तर दंड नव्हे, फौजदारी गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:56 PM2020-07-02T12:56:04+5:302020-07-02T14:19:17+5:30
अनेकजण अनलॉकचा गैरफायदा घेत आहेत. बाजारपेठ सुरू झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी गर्दी वाढत असून, मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
औरंगाबाद : अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये, अशी विनंती महापालिका प्रशासनाकडून वारंवार करण्यात आली. घराबाहेर पडताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी करावे, असे बजावण्यात आले. त्यानंतरही नागरिक नियम पायदळी तुडवीत असल्याचे मागील एक महिन्यात दिसून आले. बुधवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय स्वत: रस्त्यावर उतरले. मास्क न वापरणाऱ्या तरुणांना त्यांनी कोणताही दंड आकारला नाही. त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात इतर लोकांनी येऊ नये, तसेच सार्वजनिक व खासगी जागेत अधिक व्यक्तींनी एकत्र थांबणे, चर्चा करणे, सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजनास बंदी घातली आहे. यातच अनेक दिवस बंद असलेल्या बाजारपेठा काही नियम व अटींवरून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, अनेकजण अनलॉकचा गैरफायदा घेत आहेत. बाजारपेठ सुरू झाल्यानंतर शहरात ठिकठिकाणी गर्दी वाढत असून, मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, विधि सल्लागार अपर्णा थेटे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी मंगळवारी अचानक रॉक्सी चित्रपटगृहाजवळील कॉलनीत पाहणी केली. यावेळी सय्यद अमजद सय्यद शौकत (रा. देवगिरी कॉलनी, बडा तकिया), शेख शफिक शेख मुराद (रा. समतानगर) हे दोघे, श्रीकांत संजय नेवारे (रा.अजबनगर), अमोल गणेश दहिभाते हे दोघे तर वसीम काझी नईमोद्दीन काझी, फिरोज काझी नईमोद्दीन काझी, फिरोज अब्दुल पठाण (तिघे रा. कैलासनगर) हे मास्क न लावता दुचाकीवर जाताना दिसले. पाण्डेय यांनी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना टास्क फोर्स अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार मनपाचे वरिष्ठ लिपिक काझी सलमानोद्दीन अरिफोद्दीन यांच्या तक्रारीनंतर क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.