अनधिकृत गर्भपात केंद्र चालविणा-या महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:11 AM2017-11-25T01:11:51+5:302017-11-25T01:11:58+5:30
विवाहितेच्या संमतीविना तिचा गर्भपात केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी तपास करून आपतभालगाव येथे अनधिकृत गर्भपात केंद्र चालविणा-या नर्सला अटक केली. महिलेच्या या गर्भपात केंद्रात औषधीचा साठा आणि काही कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विवाहितेच्या संमतीविना तिचा गर्भपात केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी तपास करून आपतभालगाव येथे अनधिकृत गर्भपात केंद्र चालविणा-या नर्सला अटक केली. महिलेच्या या गर्भपात केंद्रात औषधीचा साठा आणि काही कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली.
ललिता रमेश मून ऊर्फ खाडे (४०, रा. आपतभालगाव) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदिराज म्हणाले की, पुंडलिकनगर येथील रहिवासी अर्चना सुनील वाघ यांनी दिलेल्या तक्रारीत लग्नानंतर काही दिवस सासरच्या मंडळींनी तिला चांगली वागणूक दिली. तिला एक मुलगी असून, नंतर ती पाच महिन्यांची गर्भवती असताना सासरच्या मंडळींनी तिला दुसरी मुलगीच होईल असे म्हणून तिचा छळ सुरू केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी तिच्या इच्छेविरोधात गतवर्षी आपतभालगाव येथे गर्भपात केला. माहेरहून तीन लाख रुपये आणण्यासाठी सासरी होणाºया छळाला कंटाळून आणि इच्छेविरोधात गर्भपात केल्याची तक्रार तिने पुंडलिकनगर ठाण्यात नोंदविली होती. यावरून आरोपी सुनील वाघ, शिवाजी वाघ, कमलबाई वाघ, अनिल वाघ, नणंद सविता, नंदई बापू डिघोळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अशोक आव्हाड यांच्या पथकाने आपतभालगाव येथे जाऊन गर्भपात करणाºया महिलेला शोधून काढले. तेव्हा ती तेथे अनधिकृत गर्भपात केंद्रच चालवीत असल्याचे त्यांना आढळले. तेथे औषधीचा मोठा साठाही पोलिसांना मिळाला. ती नर्स काही वर्षे एका रुग्णालयात कार्यरत होती. नंतर तिने नोकरी सोडून देऊन चोरट्या मार्गाने गर्भपात करणे, प्रसूती करण्याची कामे सुरू केली. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाºयांना सोबत घेऊन तिच्या दोन मजली घरावर धाड मारली, तेव्हा तेथील दोन खोल्यांमध्ये तिने अनधिकृत गर्भपात केंद्र उघडल्याचे दिसून आले. तेथे पोलिसांना गर्भपाताच्या गोळ्या आणि औषधीचा साठा आणि काही कागदपत्रे, रक्ताने माखलेले कपडे, गर्भपात करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे मिळाली. या दोन्ही खोल्या वैद्यकीय अधिकाºयांसमोर सील करण्यात आल्या. औषधी डॉक्टरांनी जप्त केली. या महिलेने आतापर्यंत किती महिलांचे अनधिकृत गर्भपात केले, याबाबतचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अशोक आव्हाड, गणेश डोईफोडे, महिला पोलीस गायकवाड, एसपीओ संतोष बोदक, शिवाजी गुट्टे यांनी केली.