कमळापुरातून मुलासह महिला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:04 AM2021-01-25T04:04:46+5:302021-01-25T04:04:46+5:30
सतीश शालिकराम गिरणारे हे पत्नी अर्चना (२३) व मुलगा आशू (४) यांच्यासह कमळापुरात राहतात. २० जानेवारीला सकाळी सतीश कंपनीत ...
सतीश शालिकराम गिरणारे हे पत्नी अर्चना (२३) व मुलगा आशू (४) यांच्यासह कमळापुरात राहतात. २० जानेवारीला सकाळी सतीश कंपनीत कामासाठी गेले होते. रात्री ८ वाजता कंपनीतून घरी आल्यावर त्यांना पत्नी व मुलगा घरात दिसून न आल्याने त्यांनी परिसरात सर्वत्र त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेही मिळून न आल्याने सतीश गिरणारे यांनी पत्नी व मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिसून असून, पुढील तपास पोहेकॉ. सुखदेव भागडे करीत आहेत.
फोटो क्रमांक- अर्चना गिरणारे
-----------------------------
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
वाळूज महानगर : बजाजनगरातील तनवानी विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस हनुमान भोंडवे, मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कल्याणी लोंढे, आर्या खांडेकर, अंजली शिनगारे, किरण मोरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका पाटील यांनी केले, तर आभार अस्मिता आढेराव यांनी मानले.
-----------------
पंढरपुरात विविध धार्मिक कार्यक्रम
वाळूज महानगर : छोट्या पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात रविवारी (दि.२४) पुत्रदा एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.३० वाजता महाभिषेक, दुपारी ११ वाजता ह.भ.प. दौलत महाराज मनाळ यांचे कीर्तन, दुपारी १ वाजता फराळ व सामुदायिक हरिपाठ व रात्री हरिजागर होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.
---------------------
मेटलमॅन कंपनीत मोफत नेत्र तपासणी शिबिर
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील मेटलमॅन कंपनीत शनिवारी (दि.२३) मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन उद्योजक श्रीकांत मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अनिल डहाळे, प्रकाश येखंडे, कृष्णकांत बिजमवार, आशिष शर्मा, विजय साळवे, नवनीत काबरा, सूर्यकांत शानबाग, प्रवीण जोशी, लायन्स क्लबचे अध्यक्ष संजीव गुप्ता, राजेंद्र लोहिया, विनोद चौधरी, प्रभाकर मते आदींची उपस्थित होती.
------------------------
रांजणगावात बेशुद्ध पडलेल्या इसमाचा मृत्यू
वाळूज महानगर : रांजणगावात राहत्या घरी शनिवारी (दि.२३) पहाटे बेशुद्ध पडलेल्या हरिदास साहेबराव सोनवणे (३८, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव) यांना उपचारासाठी दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. हरिदास सोनवणे हे शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास राहत्या घरी बेशुद्ध पडले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर देवीदास सोनवणे यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासून हरिदास सोनवणे यांना मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
------------------------