गरिबीला कंटाळून तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:25 AM2017-11-28T01:25:24+5:302017-11-28T01:25:33+5:30
पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील १९ वर्षीय तरुणीने सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरात विष प्राशन करुन आत्महत्या केली. तिने गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती गावक-यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोड : पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील १९ वर्षीय तरुणीने सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरात विष प्राशन करुन आत्महत्या केली. तिने गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती गावक-यांनी दिली.
राजश्री काकासाहेब सातपुते असे मयत तरुणीचे नाव आहे. सकाळी तिने विष प्राशन केल्याचे लक्षात येताच तिचा भाऊ व आई -वडिलांनी तिला तातडीने पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
वैद्यकीय अधिकाºयांनी उपचार करून पुढील उपचारासाठी तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरु असताना सायंकाळी राजश्रीचा मृत्यू झाला.
जमादार तडवी यांनी पाचोड पोलिसांना माहिती दिली. पाचोडचे सपोनि. महेश आंधळे व जमादार मते यांनी घाटी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सोमवारी सायंकाळी सहा वाजता शोकाकुल वातावरणात राजश्रीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. शासनाने या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी अनिल हजारे, परासराम हजारे, भागवत हजारे, संदीप हजारे, पांडुरंग हजारे यांनी केली आहे.
राजश्रीच्या वडीलांकडे जेमतेम शेती असून त्यात सोसायटी व बँकेचे कर्जही डोक्यावर आहे. गेल्या वर्षी शेतीतही उत्पन्न झाले नव्हते.
यंदा कपाशी चांगली आली पण बोंडअळीने त्यावर हल्ला केल्याने मोठे नुकसान झाले, असे दादेगाव येथील ग्रामस्थ म्हणाले.