पतीच्या जाचाने खचलेल्या महिलेची चिमुकलीसह तलावाकडे धाव घेतली; दामिनी पथकामुळे अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 01:30 PM2020-08-24T13:30:09+5:302020-08-24T13:35:18+5:30

दामिनी पथकाने विवाहितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा तिने हंबरडा फोडला.

The woman, exhausted by her husband's harassment, ran to the lake with a daughter for suicide; Damini's squad averted disaster | पतीच्या जाचाने खचलेल्या महिलेची चिमुकलीसह तलावाकडे धाव घेतली; दामिनी पथकामुळे अनर्थ टळला

पतीच्या जाचाने खचलेल्या महिलेची चिमुकलीसह तलावाकडे धाव घेतली; दामिनी पथकामुळे अनर्थ टळला

googlenewsNext
ठळक मुद्दे तलावात केला चिमुकलीसह आत्महत्यचे प्रयत्न केला विवाहितेला आत्महत्येपासून दामिनी पथकाने केले परावृत्त

औरंगाबाद :  मद्यपी पतीच्या जाचाला कंटाळून सलीम अली सरोवरात तीन वर्षांच्या चिमुकलीसह आत्महत्या करण्यास गेलेल्या २७ वर्षीय विवाहितेला दामिनी पथकाने समुपदेशन करून आत्महत्येपासून परावृत्त केल्याने मायलेकीचा जीव वाचला.

शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सलीम अली सरोवराजवळ महिला चिमुकलीसह रडत बसलेली होती. सजग नागरिकांनी हा प्रकार नियंत्रण कक्षाला कळविला. दरम्यान, त्याचवेळी परिमंडळ-१ परिसरात दामिनी पथक गस्तीवर होते. तेव्हा नियंत्रण कक्षाने वायरलेसद्वारे पोलिसांना तात्काळ सलीम अली सरोवराकडे जाऊन त्या महिलेला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा संदेश दिला. उपनिरीक्षक वर्षाराणी आजले यांच्या नेतृत्वाखालील दामिनी पथक तात्काळ तेथे पोहोचले.

या पथकाने त्या विवाहितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा तिने हंबरडा फोडला. तेव्हा या पथकाने तिची समजूत काढली. दामिनी पथक हे महिलांच्या मदतीसाठीच आहे. यापुढे तुला काहीही त्रास होणार नाही, असा विश्वास दिला. तेव्हा तिने सांगितले की, आम्ही मूळचे कन्नडचे रहिवासी असून, हडको परिसरात राहतो. माझे डीएडपर्यंत शिक्षण झालेले आहे. पती सरकारी कर्मचारी आहेत; पण दारूचे व्यसन असल्याने तो मला नेहमीच मारहाण करतो. त्यामुळे जीवनाचा कंटाळा आल्याने मुलीला घेऊन सलीम अली सरोवरात जीव देण्याचा निर्णय घेतला, अशी व्यथा तिने पथकासमोर मांडली. तेव्हा उपनिरीक्षक वर्षाराणी आजले व पथकातील महिलांनी तिची समजूत काढली. ही बाब तिला पटल्याने ती आत्महत्येपासून परावृत्त झाली. तिला पथकाने सुरक्षितपणे घरी नेऊन सोडले.
 

Web Title: The woman, exhausted by her husband's harassment, ran to the lake with a daughter for suicide; Damini's squad averted disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.