आरटीओत महिलेने दिला एजंटला चोप
By Admin | Published: July 20, 2016 12:10 AM2016-07-20T00:10:32+5:302016-07-20T00:31:41+5:30
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात एजंटशिवाय कोणतीही कामे सहज होत नाही, हे सर्वांना माहीत आहे. तात्काळ काम होण्याच्या आशेने वाहनधारक एजंटचा रस्ता धरतात.
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात एजंटशिवाय कोणतीही कामे सहज होत नाही, हे सर्वांना माहीत आहे. तात्काळ काम होण्याच्या आशेने वाहनधारक एजंटचा रस्ता धरतात. मात्र, छोट्या-छोट्या कामांसाठी एजंटकडून आर्थिक पिळवणूक आणि मनमानी कारभार होतो. याची तक्रार करण्याकडे बहुतांश वाहनधारक दुर्लक्ष करतात; परंतु पैसे घेऊनही लायसन्स देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एजंटला कार्यालयाच्या आवारातच चोप देत एका महिलेने मंगळवारी चांगलीच अद्दल घडविली.
आरटीओ कार्यालयात विविध कामे एजंटशिवाय करणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे लर्निंग, पर्मनंट लायसन्स, परवाना नूतनीकरण, अशी विविध कामे स्वत:च करणारे सर्वसामान्य नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकतच राहतात. एजंटशिवाय कामे करणाऱ्यांची काही जणांकडून मुद्दाम दिशाभूल केली जाते. त्यामुळे नाइलाजाने वाहनधारकांना एजंट गाठावाच लागतो.
आरटीओ कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी एजंटांनी बस्तान मांडले आहे. तात्काळ काम करून देण्यात येईल, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. अवघ्या काही रकमेत होणाऱ्या कामांसाठी वाहनधारकांकडून जास्तीचे पैसे उकळले जातात. परंतु महिनोन्महिने वाहनधारकांना त्या कामासाठी नुसती प्रतीक्षा करावी लागते. एवढे सर्व होऊनही वाहनधारकांकडून तक्रार करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कार्यालयात एजंटगिरी दिवसेंदिवस वाढतच आहे.
आरटीओ कार्यालयात मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मात्र, वेगळेच चित्र पाहायला मिळाले. पैसे घेऊनही लायसन्स देण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका एजंटला संतप्त महिलेचा दुर्गावतार पाहावा लागला. अनेक दिवस उलटूनही लायसन्स मिळत नसल्याने पैसे परत करण्याची मागणी महिलेने केली. एजंट टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच महिलेने मग त्यास चांगलाच चोप दिला. यावेळी वाहनधारक आणि एजंटांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे काही वेळेसाठी तणावपूर्ण वातावरण झाले. ही महिला आपली तक्रार घेऊन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्याकडे गेली. कार्यालयात कोणतेही अधिकृत एजंट नसून याविषयी पोलिसांत तक्रार देण्याची सूचना त्यांनी केली.
काही जणांवर बंदी
या एजंटने यापूर्वीही पैसे घेऊन अनेकांचे काम करण्याचे टाळले आहे. त्याच्याकडून वाहनधारकांची फसवणूक होते, हे अन्य एजंटांना माहीत आहे. तरीही त्याच्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांना याची कल्पना दिली जात नाही. काही दिवसांपूर्वीच आठ एजंटांविरुद्ध कारवाई करून आरटीओ कार्यालयाच्या आवारात येण्यास बंदी घालण्यात आली.