महिला डॉक्टरला दाखविला चाकूचा धाक, रस्त्यावरून ओढण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:04 PM2020-10-02T12:04:49+5:302020-10-02T12:05:45+5:30
घाटीतील वसतिगृहातून सुपर स्पेशालिटी ब्लॉककडे जाणाऱ्या महिला निवासी डॉक्टरला चाकू दाखवून आणि तोंड दाबून बाजूच्या झुडपात नेण्याचा प्रयत्न दोन जणांनी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली.
औरंगाबाद : देशभरात उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेविषयी संताप व्यक्त होत असतानाच घाटीतील वसतिगृहातून सुपर स्पेशालिटी ब्लॉककडे जाणाऱ्या महिला निवासी डॉक्टरला चाकू दाखवून आणि तोंड दाबून बाजूच्या झुडपात नेण्याचा प्रयत्न दोन जणांनी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली.
मात्र डॉक्टरने आरडाओरड केल्याने त्यांनी तिथून पळ काढला आणि पुढचा अनर्थ टळला. सदरील परिसरातीलजुन्या वार्ड ५ च्या समोर हा प्रकार घडला. त्या डॉक्टर रात्री १२ च्या सुमारास सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये ड्युटीवर जात होत्या. वसतिगृहापासून अवघ्या काही मीटरच्या अंतरावर येताच पाठीमागून दोन तरूणांनी त्यांना चाकू दाखवून अडविले. डॉक्टरांचे तोंड दाबून बाजूला झुडपात ओढण्यात प्रयत्न केला. मात्र डॉक्टरने केलेले आरडाओरडा त्या दोघांना पळून जाण्यास भाग पाडणारा ठरला.
घाबरलेल्या डॉक्टर महिलेने धावतच सुपर स्पेशालिटी ब्लॉक गाठले. तेथील सुरक्षारक्षक, सहकारी आणि वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. सुरक्षारक्षकांनी शोधाशोध केली असता आसपास कोणीही आढळले नाही. या घटनेमुळे घाटीत खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा नव्याने ऐरणीवर आला आहे.
घाटीत रात्री ड्युटीवर जाणाऱ्या निवासी महिला डॉक्टरांसोबत आणि ड्युटी संपवून पुन्हा वसतिगृहात जाणाऱ्या महिला डॉक्टरांसोबत यापुढे सुरक्षारक्षक सोबत जाणार आहेत, असा निर्णय अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने, उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. सुधीर चौधरी, डॉ. वर्षा रोटे, डॉ. विकास राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या परिसरात वाढलेली झाडे- झुडपे हटविण्याचे काम गुरूवारी हाती घेण्यात आले.