वाळूजमधून दोन मुलांसह महिला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:04 AM2021-05-29T04:04:21+5:302021-05-29T04:04:21+5:30
वाळूज महानगर : वाळूज येथून दोन मुलांसह महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. उजमा ...
वाळूज महानगर : वाळूज येथून दोन मुलांसह महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. उजमा अल्तमश शेख (२८ रा.हिदायनगर, वाळूज) ही गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास आपली वहिनी उदा शेख हिस मी दवाखान्यात जाऊन येते, असे म्हणून मुलगा अमश शेख (७) व मुलगी इजना (३) यांना सोबत घेऊन घराबाहेर पडली होती. मात्र, ती घरी न परतल्याने तिचा पती अल्तमश शेख याने पत्नी व दोन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे. या बेपत्ता तिघांचा शोध सहा.फौजदार शेख सलीम हे घेत आहेत.
फोटो क्रमांक- शेख उजमा, फोटो क्रमांक- शेख अमश, फोटो क्रमांक- शेख इजना
------------------------------
कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील बीकेटी कंपनीच्या पार्किंगमधून चोरट्याने कामगाराची दुचाकी लांबविली. नारायण केशव कदम (रा.वडगाव) हे २३ मे रोजी दुचाकीने (एम.एच.२०, एफ.ए.२८५९) बीकेटी कंपनीत कामासाठी गेले होते. कंपनीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------
रांजणगावात बेशुद्ध अनोळखी इसमाचा मृत्यू
वाळूज महानगर : रांजणगावात शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेल्या अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. रांजणगावातील शहीद भगतसिंह शाळेजवळ ५५ वर्षीय अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. या इसमास पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर, उपचारादरम्यान सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
--------------------
लिंक रोड चौफुलीवर वाहतुकीची कोंडी
वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील लिंक रोड चौफुलीवर सतत वाहतूककोंडी होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या चौफुलीवर वाहतूक शाखेचे कर्मचारी थांबत नसल्याने, वाहनधारक बेशिस्तपणे वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. या चौफुलीवर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीकडे वाहतूक शाखेचे कर्मचारी कानाडोळा करीत असल्याने वाहनधारकात नाराजीचा सूर उमटत आहे.
-----------------
पंढरपूरातून दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : पंढरपुरातील ईएसआयीच्या रुग्णालयासमोरुन दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष साईनाथ तागड (रा.जामगाव) हे गुरुवार (दि.२७) कल्याण तपकीर यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.२०, डी.एम.७२५२) घेऊन पत्नी सोनालीला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले होते. दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर संतोष तागड यांना दुचाकी गायब असल्याचे दिसून आले. या दुचाकी चोरीची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
-----------------------------------