दुचाकीवरील महिलेला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:57 AM2017-11-22T01:57:42+5:302017-11-22T01:57:47+5:30
मालवाहू ट्रक (ट्रेलर)ने दुचाकीस्वार महिलेला चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-नगर महामार्गावरील लिंकरोड चौफुलीवर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : मालवाहू ट्रक (ट्रेलर)ने दुचाकीस्वार महिलेला चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-नगर महामार्गावरील लिंकरोड चौफुलीवर घडली. या अपघातात महिला जागीच ठार झाली, तर महिलेचा पतीही गंभीर जखमी झाला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, राजू काशीनाथ सोनवणे (४०, रा. हरिकृपानगर, देवळाई परिसर) व त्यांची पत्नी संगीता सोनवणे हे दोघे दुचाकी क्रमांक एम.एच.२०, बी.ए.७२२२ वर स्वार होऊन परसोडा, ता. वैजापूर येथे वडिलांना भेटण्यासाठी चालले होते. बीड बायपासकडून लिंकरोडमार्गे वैजापूरकडे जात असताना सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास लिंकरोड चौफुलीजवळ समोरून जाणाºया मालवाहू ट्रक (ट्रेलर) क्रमांक एन.एल.०१, एल.६२९२ च्या चालकाने अचानक वळण घेतल्यामुळे दुचाकीस्वार राजू सोनवणे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दोघे पती-पत्नी ट्रकखाली सापडले. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडल्यामुळे संगीता सोनवणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे निरीक्षक मनोज पगारे, सहायक फौजदार ढवळे, पोकॉ. शमशुद्दीन कादरी, पोहेकॉ. कवडे, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. जगदाळे आदींनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमी राजू सोनवणे यास मदत करीत त्यास धीर दिला. या अपघातात गंभीर जखमी राजू सोनवणे यांना उपचारासाठी, तर ठार झालेल्या त्यांच्या पत्नी संगीता सोनवणे यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर मारहाणीच्या भीतीमुळे ट्रकचालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता. या अपघातानंतर लिंकरोड चौफुलीवर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. याप्रकरणी जखमी राजू सोनवणे याचा चुलत भाऊ भरत सोनवणे याच्या तक्रारीवरून ट्रकचालक अजयकुमार बिहारीलाल (२२, रा. ईस्माईलपूर, पो.कारगापूर, ता. सोरावन, जि.अलाहाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली. या अपघातास कारणीभूत मालवाहू ट्रकमध्ये दोन मिनी ट्रकची वाहतूक करीत असताना हा अपघात घडून संगीता सोनवणे यांचा या अपघातात बळी गेला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गौतम खंडागळे करीत आहेत.