महिलेस लिफ्ट देऊन दुचाकीस्वाराने दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:04 AM2021-02-20T04:04:57+5:302021-02-20T04:04:57+5:30
वाळूज महानगर : पादचारी ज्येष्ठ महिलेस लिफ्ट देण्याचा बहाणा करून तिला मारहाण करून दुचाकीस्वार भामट्याने तिचे दागिने लांबविल्याची घटना ...
वाळूज महानगर : पादचारी ज्येष्ठ महिलेस लिफ्ट देण्याचा बहाणा करून तिला मारहाण करून दुचाकीस्वार भामट्याने तिचे दागिने लांबविल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ए. एस. क्लब, लिंक रोडवर घडली.
याविषयी अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील कुसुमबाई शिंदे (वय ६०, नाव बदलले आहे.) ही ज्येष्ठ महिला गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास कांचनवाडीला नातेवाइकांना भेटण्यासाठी पायी निघाली होती. ए. एस. क्लबवरून लिंक रोडकडे जात असताना काही अंतरावर लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दुचाकीस्वाराने कुसुमबाई यांच्याजवळ दुचाकी थांबवून त्यांना कुठे जायचे आहे, असे विचारले. यावेळी कुसुमबाई यांनी त्या दुचाकीस्वाराची विचारपूस केली असता त्याने मी चौका (ता. फुलंब्री) येथील रहिवाशी असल्याचे सांगितले. दुचाकीस्वार मुलासमान असल्याची खात्री पटल्यानंतर कुसुमबाई दुचाकीवर बसल्या. दरम्यान, काही अंतर पुढे गेल्यावर त्या दुचाकीस्वाराने शेताकडे दुचाकी वळविली असता घाबरलेल्या कुसुमबाई यांनी दुचाकीवरून उडी मारली. यावेळी दुचाकीस्वार तरुणाने मी या परिसरात बटाईने शेती करीत असून शेतात पत्नी व इतर मजूर कापूस वेचणी करीत असल्याने त्यांना भेटून तुम्हाला कांचनवाडीला सोडतो, अशी थाप मारली. मात्र घाबरलेल्या कुसुमबाई यांनी दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याने त्या दुचाकीस्वार भामट्याने झटापट करीत कुसुमबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावत एका कानातील कर्णफुले ओरबाडून घटनास्थळावरून दुचाकीवरून पलायन केले.
कुसुमबाई यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने लिंक रोडवरून ये-जा करणाऱ्या एका वाहनधारकाने त्यांना मदत करीत पोलीस नियंत्रण कक्षावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक सतीश पंडित, पो. कॉ. विनोद परदेशी, आदींनी ए. एस. ते लिंक रोडवर नाकाबंदी करून भामट्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.