पत्नीस अनैतिक संबंधाची माहिती दिल्याने महिलेची भररस्त्यात हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:20 PM2019-04-13T17:20:31+5:302019-04-13T17:28:48+5:30
अनैतिक संबंधांची माहिती पत्नीला दिल्याच्या रागातून केली हत्या
पिशोर (औरंगाबाद ) : अनैतिक संबंधांची माहिती पत्नीला दिल्याने महिलेला भररस्त्यात अडवून तीक्ष्ण हत्याराने वार करत हत्या केल्याची घटना पिशोर नजीकच्या रामनगर शिवारात शुक्रवारी घडली. याबाबत पिशोर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ताराबाई खुशालराव काकुळते (२५) रा.खातखेडा असे मयत महिलेचे नाव आहे. तर पोलिसांनीअटक केलेल्या आरोपीचे नाव सदाशिव उर्फ बाळू गणपत निकम (रा. खातखेडा) आहे.
याबाबत पिशोर ठाण्याचे सपोनि. जगदीश पवार यांनी सांगितले की, ताराबाई काकुळते (२५) ही महिला शुक्रवारी दुपारी १२ वाजे दरम्यान आपल्या नातेवाईकांकडे रामनगर येथे पायी जात होती. शिवारात असलेल्या एका मंदिराजवळ सदाशिव उर्फ बाळू निकम याने ताराबाईला अडविले. आपल्या अनैतिक संबधांबद्दल पत्नीला का सांगितले याचा जाब विचारला, तसेच माझ्याशी संबंध का ठेवत नाही, असे म्हणत धारदार शस्त्राने तिच्या मानेवर, गळ्यावर व पोटावर वार केले. वार खूप तीक्ष्ण आणि खोलवर असल्याने ताराबाई तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.
ताराबाई यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच काही नागरिकांनी शिवारात धाव घेतली. ताराबाईचे नातेवाईक संजय निकम यांनी त्यांना त्वरित पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी प्रथमोपचार केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीने औरंगाबाद घाटीत हलविण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री उशीरा ताराबाई यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सपोनि. जगदीश पवार यांनी आपल्या साथीदारांसह घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. यावेळी श्वानाने आरोपी सदाशिव निकम याच्या घरापर्यंत माग काढला. आरोपीवर संशय आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संजय निकम यांनी दिलेल्या माहितीवरून सदाशिव उर्फ बाळू निकम याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीकडून गुन्ह्याची कबुली
ताराबाई हिने पत्नीला आपल्या अनैतिक संबंधांबद्दल सांगितल्याने दोघांचे कडाक्याचे भांडण झाले होते. याचा राग आल्याने आपण हल्ला केल्याचेही त्याने सांगितले, अशी माहिती सपोनि. पवार यांनी दिली.