शिर्डीमधून बेपत्ता झालेली महिला साडेतीन वर्षांनंतर परतली; औरंगाबाद खंडपीठाने दिले पतीच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:32 PM2020-12-22T16:32:48+5:302020-12-22T16:34:04+5:30
दीप्ती सोनी साडेतीन वर्षे कुठे होत्या याचा शोध घेण्याचे निर्देश खंडपीठाने पोलीस यंत्रणेस दिले आहेत .
औरंगाबाद : सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी शिर्डीमधून बेपत्ता झालेल्या दीप्ती सोनी या महिलेस शिर्डी पोलिसांनी सोमवारी औरंगाबाद खंडपीठात हजर केले. न्या. आर.व्ही. घुगे आणि न्या. वी. यु. देबडवार यांनी सदर महिलेस याचिकाकर्ता मनोज सोनी यांच्या ताब्यात दिले.
शिर्डीतून भक्तांच्या गायब होण्याचा शोध घेण्यासाठी मनोज सोनी यांनी दाखल केलेली याचिका खंडपीठाने निकाली काढली. मात्र, तिचे सुमोटो फौजदारी जनहित याचिकेत रूपांतर केले. दीप्ती सोनी साडेतीन वर्षे कुठे होत्या याचा शोध घेण्याचे निर्देश खंडपीठाने पोलीस यंत्रणेस दिले आहेत .
मनोज सोनी त्यांची पत्नी, मुले व कुटुंबीयासह १० ऑगस्ट २०१७ रोजी शिर्डीत आले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी एका दुकानातून गायब झाल्या होत्या. त्यांचा एक महिना शिर्डीतच शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. पोलिसात तक्रार दिल्यानंतर सोनी यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. साडेतीन वर्षे झाल्यानंतरही दीप्ती सापडल्या नसल्याने खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीत पोलीस यंत्रणेवर नाराजी व्यक्त करीत ताशेरे ओढले होते. खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणात तपास करण्याचे निर्देश दिले होते. १७ डिसेंबर रोजी दीप्ती अचानक त्यांच्या वहिनीच्या घरी इंदूरला परतल्या होत्या. त्यांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी औरंगाबाद खंडपीठासमोर हजर केले.