बाई, तुमच्या पतीचा शोध अद्याप लागला नाही, तपास चालू आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:02 AM2021-06-06T04:02:26+5:302021-06-06T04:02:26+5:30

प्रभुदास पाटोळे औरंगाबाद : ‘बाई तुमच्या पतीचा शोध अद्याप लागला नाही. तपास चालूच आहे .....आम्ही ...

Woman, your husband has not been found yet, the investigation is on ... | बाई, तुमच्या पतीचा शोध अद्याप लागला नाही, तपास चालू आहे...

बाई, तुमच्या पतीचा शोध अद्याप लागला नाही, तपास चालू आहे...

googlenewsNext

प्रभुदास पाटोळे

औरंगाबाद : ‘बाई तुमच्या पतीचा शोध अद्याप लागला नाही. तपास चालूच आहे .....आम्ही शोध घेत आहोत...’ बेपत्ता झालेल्या तिच्या पतीचा आता तरी शोध लागला असेल, या आशेने सिटी चौक पोलीस ठाण्यात जाणारी महिला गेल्या १४ वर्षांपासून पोलिसांचे हेच उत्तर ऐकून जड अंतःकरणाने घरी परत येते. आईचा दुःखी चेहरा पाहूनच आपल्या वडिलांचा आत्तापर्यंत पत्ता लागला नसल्याचे मुलगा आणि मुलगी समजून घेतात. एक ना एका दिवशी वडिलांचा पत्ता लागेल असे आश्वासन आईला देऊन हे चिमुकले तिला धीर देण्याचा प्रयत्न करतात. गेली १४ वर्षे हे असेच चालू आहे.

ही सत्यकथा आहे भावसिंगपुरा परिसरातील राजनगर, लालमाती वसाहतीत राहणाऱ्या हिराबाई बाळू धोंगडे आणि त्यांचा मुलगा गणेश (१६) आणि मुलगी रुपाली (१३) यांची.

कचनेर, चितेगाव येथील अशोकराव घोरपडे यांची मुलगी हिराबाईचे लग्न २००४ साली जाफ्राबाद तालुक्यातील सोनूशी येथील रामचंद्र धोंगडे यांचा मुलगा बाळू याच्यासोबत झाले होते. त्यावेळी धोंगडे कुटुंब तीन मुले आणि पाच मुलीसह औरंगाबादला नाईकवाडा, अंगुरीबाग येथे राहत होते . बाळू गुलमंडी येथील किशोर पहाडे यांच्या बॅण्ड पथकात वाद्य वाजवत असे. बाळू आणि हिराबाईच्या संसारवेलीवर मुलगा आणि मुलीच्या रुपाने दोन फुले फुलली. सुखाने संसार चालू असताना २००७ साली बाळूला भयंकर ताप आला. २ ते ३ दिवस बाळू तापाने फणफणत असतानाच काहीतरी बरळू लागला. तो चप्पल आणि कपडे न घालताच घराबाहेर पळू लागला. बाळूच्या आईवडिलांनी त्याला घाटी दवाखान्यात नेले. तेथे वॉर्ड नंबर ७ मध्ये दीड महिना उपचार केल्यानंतर बरे वाटल्यामुळे बाळूला सुटी देण्यात आली.

दरम्यान, हिराबाईला तिची आई कमलबाई घोरपडे मोतीनगर, मुकुंदवाडी येथे घेऊन गेली. दवाखान्यातून आल्यानंतर १५ दिवसानंतर बाळू पुन्हा पूर्वीसारखा वेडेपणा करू लागला. २००७ साली गुलमंडीवरील घरांच्या कड्या वाजवत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाळूला रात्रभर सिटी चौक पोलीस ठाण्यात डांबले होते. बाळूची आई शांताबाई यांना हे समजताच त्यांनी बाळूला सोडवून घरी नेले होते. त्यानंतर सात-आठ दिवस घरातच राहून पत्नी हिराबाई आणि मुलांना भेटून येतो असे म्हणून बाळू घरातून गेला तो आजतागायत परत आला नाही.

२००७ ला बाळूच्या आई-वडिलांनी तक्रार दिली होती; मात्र बाळूचा पत्ता लागला नाही. बाळू बेपत्ता झाला तेव्हा त्याचा मुलगा अडीच वर्षांचा आणि मुलगी सहा महिन्याची होती.

दरम्यान, बाळूचे आई-वडील आणि दोन्ही भावांचा मृत्यू झाला. २००९ साली हिराबाई या मुलगा आणि मुलीसह राजनगर, लालमाती, भावसिंगपुरा येथे भाड्याच्या खोलीत आई शेजारी राहण्यास गेली. चार घरची धुणीभांडी करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. गेली १४ वर्षे

हिराबाई आपल्या लेकरांना आई आणि वडिलांचे प्रेम देत आहे. लेकरांनी वडिलांना केवळ फोटोमध्ये पाहिले आहे.

सुरुवातीस काही वर्षे हिराबाई दर ८ते १५ दिवसांनी सिटीचौक ठाण्यात जाऊन पतीचा शोध लागला का अशी विचारणा करीत असे. आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती ठाण्यात जाऊन चौकशी करते. मात्र प्रत्येक वेळी '' तपास चालू आहे'' हे पोलिसांचे ठरलेले उत्तर ऐकून ती निराश होते. मात्र '' निबिड अंधकारातच दडला आहे उद्याचा उषःकाल '' या आशेवर हिराबाई आणि तिची मुले जगत आहेत.

'' आज माझ्या लेकरांचा मी उदरनिर्वाह करीत आहे. माझा पती कोणत्याही अवस्थेत सापडला तरी त्यालाही पोसण्याची माझी तयारी आहे . केवळ लेकरांच्या डोक्यावर वडिलांचे छत्र पाहिजे '', असे हिराबाई म्हणते.

Web Title: Woman, your husband has not been found yet, the investigation is on ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.