बनोटी येथील प्रा.आ.केंद्राच्या प्रवेशद्वारातच महिलेची प्रसुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:12 AM2019-01-07T00:12:55+5:302019-01-07T00:13:46+5:30
डॉक्टर, कर्मचारी गैरहजर : आठवडी बाजार असतानाही दवाखान्यात शुकशुकाट
बनोटी : येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकही आरोग्य कर्मचारी हजर नसल्याने आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच रविवारी महिलेची प्रसुती झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या केंद्रावर ३९ खेड्यांचा भार असूनही येथे डॉक्टर नेहमीच गैरहजर असतात. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागते.
रविवारी बनोटीचा आठवडी बाजार असतानाही प्रा.आ. केंद्र रामभरोसे होते. चारनेर येथील वैशाली भिवसने (२५) ही महिला मुखेड येथे माहेरी बाळंतपणासाठी आली होती. रविवारी सायंकाळी सहा वाजता त्यांना प्रसुती वेदना होऊ लागल्याने वडील सांडू शेळके यांनी १०८ क्रमांकावर फोन लावून रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतु रुग्णवाहिका दोन महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने आलीच नाही. वेदना असह्य झाल्याने खाजगी रिक्षा करुन या महिलेला बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता दवाखान्यात कुणीच हजर नव्हते.
प्रसुती कळा असह्य झाल्याने शेवटी ही महिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारातच प्रसूत झाली. प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ राहणाºया रेखा शिंदे, मायाबाई शेळके, अंजनाबाई शेळके यांनी धाव घेऊन सदर महिलेला मदत केली. या महिलेने मुलीस जन्म दिला. आरोग्य शिपाई भाऊसाहेब कोलते यांनी दवाखान्यात नेऊन खाजगी डॉक्टरांकडून उपचार करुन घेतले.
शेकडो रुग्ण उपचाराविना परतले
रविवारी बनोटीचा आठवडी बाजार असल्याने आजूबाजूच्या खेड्यावरुन शेकडो रुग्ण उपचारासाठी बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. परंतु नेहमीप्रमाणे केंद्रात कुणीही हजर नसल्याने त्यांना उपचाराअभावी परतावे लागले. दुष्काळात गरीब जनतेच्या जिवाशी खेळणाºया डॉक्टरांसह कर्मचाºयांवर कडक कारवाई करावी व कायमस्वरुपी डॉक्टर व कर्मचारी नेमणुकीस ठेवावे, अशी मागणी संतप्त गावकºयांनी केली.