महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:16 AM2018-07-18T01:16:55+5:302018-07-18T01:17:48+5:30
जयभवानीनगरमधील नाल्यावरील अतिक्रमण हटविण्यास एका महिलेने विरोध करीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे अतिक्रमण हटाव कारवाईला ब्रेक लागला असून, पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जयभवानीनगरमधील नाल्यावरील अतिक्रमण हटविण्यास एका महिलेने विरोध करीत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे अतिक्रमण हटाव कारवाईला ब्रेक लागला असून, पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना दोन मजली घर वाचविण्यासाठी नाला बाजूने वळविण्यात यावा, अशी मागणी करीत शकुंतलाबाई सोळुंके या महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेत जाळून घेण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस व महापालिका कर्मचा-यांनी तातडीने त्यांना रोखले. या घटनेनंतर अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्तास थांबविण्यात आली.
तेथील नाल्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडल्यानंतर आयुक्तांनी नाल्यातील अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी उपायुक्त रवींद्र निकम यांच्यावर दिली. त्यांनी कारवाईला विलंब केल्याने त्यांचे निलंबन केले. यानंतरही मनपा पथक नाल्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी जयभवानीनगराकडे फिरकले नाही. सोमवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अचानक पाहणी करून अतिक्रमणे तशीच असल्याचे आढळले. त्यानंतर आयुक्तांनी फर्मान सोडताच मंगळवारी अतिक्रमण हटाव विभागाने मार्किंगनिहाय कारवाई सुरू केली.