महिलांनी दिला बांगड्यांचा आहेर
By Admin | Published: June 17, 2014 12:11 AM2014-06-17T00:11:27+5:302014-06-17T01:15:02+5:30
बदनापूर : पाणीटंचाईवर प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ संतापलेल्या महिलांनी संबंधितांना बांगड्यांचा आहेर केला.
बदनापूर : रास्ता रोको करूनही बदनापूर शहरातील पाणीटंचाईवर प्रशासनाकडून अद्यापही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ संतापलेल्या महिलांनी संबंधितांना बांगड्यांचा आहेर करून व मडके फोडून आपला निषेध व्यक्त केला.
शहरातील वार्ड क्र ४ मध्ये पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे या प्रभागातील रहिवाशांनी दि २७ मे रोजी मोर्चा काढून पाण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांना ३० मेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु संबंधितांनी हे आश्वासन न पाळल्याने दि ३१ मे रोजी या प्रभागातील महिलांनी अचानक रास्ता रोको केला. गटविकास अधिकारी व पोलिसांनी मध्यस्थी करून ३ जूनपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले; परंतु अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्यामुळे पुन्हा या प्रभागातील महिलांनी आंदोलन केले. निवेदनावर रामभाऊ उनगे, अंबादास कोळसकर, वैजिनाथ जऱ्हाड, भाऊसाहेब इंदलकर, बाबासाहेब कहाळे, पांडुरंग जऱ्हाड, कैलस पवार, राजू इंदलकर, बाबासाहेब खैरे, लल्लूप्रसाद आतकरे, महेश कऱ्हाळे, केशव जऱ्हाड, रमेश खैरे, रूस्तुम सावंत, विठ्ठल चोरमारे, राजू साळुंके, परसराम खैरे, संजय शिंदे केसरबाई बनकर यांची नावे आहेत. (वार्ताहर)