दारूबंदीसाठी सातेफळात महिलांचा जागता पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2017 12:33 AM2017-05-30T00:33:02+5:302017-05-30T00:35:51+5:30
टेंभुर्णी : एखाद्या समस्येला वैतागलेल्या महिलांनी रुद्रावतार धारण केला तर काय होऊ शकते याचा प्रत्यय जाफराबाद तालुक्यातील सातेफळ गावाला सोमवारी आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : एखाद्या समस्येला वैतागलेल्या महिलांनी रुद्रावतार धारण केला तर काय होऊ शकते याचा प्रत्यय जाफराबाद तालुक्यातील सातेफळ गावाला सोमवारी आला. गावात महिलांनी दारूबंदीसाठी पोलीस व ग्रामपंचायतीवर अवलंबून न राहता गस्ती पथकाची स्थापना केली आहे. महिलांचे हे गस्ती पथक आता दारूबंदीसाठी रात्रंदिवस जागता पहारा देताना दिसत आहे.
सातेफळ गावात अवैध दारू विक्री होत असल्यामुळे अनेक युवक व्यसनाधीन बनले आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. ग्रामपंचायत व पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दारूबंदी होत नसल्याने आता तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा सवीता माळी यांनीे गावातील महिलांना सोबत घेऊन दारूबंदी विरुद्ध थेट एल्गार पुकारण्यासाठी गस्त पथकाची स्थापना केली आहे.
या महिला गटागटाने रात्री व दिवसा पथकात सहभाग घेत आहेत. पथकातील महिलांनी गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद देण्यास सुरुवात केल्याने तळीरामांची महिला पथकास पाहतात भागंभाग पाहायला मिळत आहे. परिणामी गावात दारू विक्री बंद झाली आहे. महिलांनी घेतलेल्या या पुढाकाराचे ग्र्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
महिलांच्या या गस्त पथकात ममताबाई काळे, सुमनबाई हरणे, शोभा घाडगे , कांताबाई जाधव, सुमनबाई निकाळजे, शांताबाई खंदारे, पुंजाबाई खंदारे, अंजनाबाई जटाळे, गयाबाई साळुंखे, पुष्पा मुळे, मंदाबाई बनकर, राधाबाई ससाणे, पद्माबाई तांबे, मीराबाई माळी, नंदाबाई फुलमाळी, पुरणाबाई निकाळजे, रुख्मणबाई सोनुने, कवसाबाई जटाळे , फुलाबाई खंदारे यांचा समावेश आहे. महिलांनी दारूबंदीसाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे गावात अनेकांचे संसार पुन्हा फुलू लागल्याने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.