जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या समाजसेवकाची महिलांनी काढली धिंड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:42 AM2023-07-26T11:42:03+5:302023-07-26T11:45:09+5:30
महिलांनी चपलेने मारहाण करत धिंड काढली, ठाण्यात आणून पोलिसांच्या केले हवाली
कन्नड : शासकीय योजनांच्या कागदपत्रावर पतीस मयत दाखविल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या कारणावरून एका सामाजिक कार्यकर्त्याची तीन महिलांनी मारहाण करून धिंड काढल्याची घटना शहरात मंगळवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्नड शहराजवळील मक्रणपूर गावातील सामाजिक कार्यकर्ते बापू गवळी यांना मंगळवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास तीन महिलांनी पकडून चपलेने मारहाण करीत रस्त्याने मक्रणपूरपासून बसस्थानक, चाळीसगाव रस्त्याने अण्णाभाऊ साठे चौक, तहसील कार्यालय रोडने पोलिस ठाणे येथे आणत असल्याचे चित्र नागरिकांना पाहावयास मिळाले. या महिला गवळी यांना शिवीगाळ करीत होत्या. हा काय प्रकार आहे, हे नागरिकांना समजत नव्हते.
शहर पोलिसांच्या ताब्यात या व्यक्तीला देण्यात आले. त्यानंतर याबाबत मीराबाई रामलाल पवार (रा. मक्रणपूर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यात म्हटले आहे की, आरोपी बापू गवळी याला, तू माझ्या नवऱ्याला शासकीय योजनांच्या कागदपत्रावर मयत का दाखवले, असे विचारले असता त्याने जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. सोबतच्या शांताबाई मोरे व लताबाई सोनवणे या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली. याबाबतच्या तक्रारीनंतर बापू गवळी याच्याविरुद्ध ॲक्ट्रॅासिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद बापू गवळी यांनी पोलिसांत दिली आहे. त्यावरून १४ महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ जयंत सोनवणे करीत आहेत.
बघ्यांची गर्दी; अनेकांकडून चित्रीकरण
कन्नड शहरातून तीन महिला एका व्यक्तीची धिंड काढत असताना त्यांच्या पाठीमागे मोठा जमाव जमत होता. अनेक जण ही घटना आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करताना दिसत होते. शहरात दिवसभर या घटनेची चर्चा होती.