जालना जिल्ह्यात वीज पडून महिला ठार; औरंगाबादेत दोन तरुण वाहून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:33 PM2018-06-22T23:33:01+5:302018-06-22T23:33:58+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे सारोळा परिसरातील अंजना नदीला मोठा पूर आला. यात दोघे तरूण वाहून गेले.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे सारोळा परिसरातील अंजना नदीला मोठा पूर आला. यात दोघे तरुण वाहून गेले. यातील एकाला वाचविण्यात यश आले. दुसऱ्या घटनेत जालना जिल्ह्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला.
कन्नड तालुक्यात सारोळा -नाचनवेल रस्त्यावरील पुलावरून वाहणा-या पुराचा आनंद घेत असताना सत्तार पठाण व सचिन राजू माकवान (३२, रा. सारोळा) हे दोन तरुण वाहून गेले. पोहता येत असल्याने सत्तार हा कडेवर पोहोचला. त्याला नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने बाहेर काढल्याने तो बचावला. मात्र सचिनला पोहता येत नसल्याने तो पुराच्या प्रवाहात वाहून गेला. पिशोरचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार, जमादार परमेश्वर दराडे, पो.ना. किसन गवळी यांनी गावकºयांच्या मदतीने कोल्हापुरी बंधाºयात शोध घेतला, मात्र रात्रीची वेळ असल्याने सचिन मिळून आला नाही. नदीकाठच्या गावातील पोलीस पाटलांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून शनिवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार असल्याचे सपोनि. पवार यांनी सांगितले. जखमी सत्तारला उपचारासाठी सिल्लोडला हलविण्यात आले आहे.
जालना तालुक्यातील गुंडेवाडी परिसरात दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून सुमनबाई रावसाहेब गजर (४०) या जागीच ठार झाल्या, तर त्यांच्या सोबत असलेली त्यांची मुलगी पूजा रावसाहेब गजर (१७) आणि मोनाबाई मुरलीधर गजर (३५) या गंभीर जखमी झाल्या. पाऊस आल्याने शेतातील काम थांबवून या सर्वजणी झाडाखाली थांबल्या होत्या. जमखींना येथील खासगी रूग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अंबड व परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. जालना तालुक्यातील मानदेवूळगाव व परिसरात तसेच भोकरदन व परिसरातही पावसाने हजेरी लावली.
हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांपासून शेतकºयांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. अखेर शुक्रवारी रात्री ८. ३० वाजता जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप पिकास जिवदान मिळाले आहे. तर हिंगोली शहरात रस्ते जलयम झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. शेतकरी मागील आठ दिवसांपासून जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होते. मात्र उशिरा का होईना मेघ गर्जनेसह झालेल्या पावसाने शेतकºयांना धिर आला आहे. जिल्ह्यात सेनगाव, डोंगरकडा, बासंबा, खुडज, कळमनुरी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर काही भागात वीज पुरवठाही खंडीत झाल्याने ग्रामस्थांना मात्र रात्र अंधारात काढावी लागली. तर अनेक भागात नदी, नाले दुथडी भरुन वाहत होते. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता.
बीड जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी
बीड : शुक्रवारी सायंकाळी बीड शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारी चारच्या सुमारास शिरूर, धारूर व गेवराई तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शिरूर शहरातील रस्त्यांवर गटारीचे पाणी वाहून दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. ऐन शाळा सुटण्याच्या सुमारास पावसास सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत घरी जावे लागले. गेवराई येथेही पावसामुळे गटारी तुंबल्या होत्या, तर बस स्थानक परिसरात पाणी साचले होते. जिल्ह्यात १ ते २२ जूनदरम्यान सरासरी ९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ १४ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.