नटूनथटून आल्या अन दर्शन रांगेत घुसल्या; थोड्यावेळाने कळले नवरीच्या गळ्यातील सोनसाखळी पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 07:03 PM2022-01-15T19:03:46+5:302022-01-15T19:04:00+5:30
मकर संक्रांतीनिमित्ताने नाथमंदीर, गोदावरी घाटासह विठ्ठल मंदिरात वाण वाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती.
पैठण ( औरंगाबाद ) : मकरसंक्रांती निमित्त पैठण येथील नाथ मंदीर परिसरात दर्शनासाठी आलेली नवविवाहिता व एका वृध्देच्या गळ्यातील सोन्याची पोत महिला चोरट्यांनी लांबविली. विशेष म्हणजे, चोर असलेल्या महिला चांगल्या तयार होऊन आल्या होत्या. त्या मंदीरातील महिलांच्या गर्दीत घुसल्या होत्या. हे मंदीरातील सीसीटीव्ही फुटेज वरून समोर आले आहे.
मकर संक्रांतीनिमित्ताने शुक्रवारी नाथमंदीर, गोदावरी घाटासह विठ्ठल मंदिरात वाण वाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. सुमन मदन गोजरे (६५, रा नारळा ) व त्यांची सून वैष्णवी गोजरे याही नाथमंदीर परिसरात दर्शनासाठी आल्या होत्या. दरम्यान, परिसरातील विठ्ठल मंदिरात वाण वाहण्यासाठी महिलांची तोबा गर्दी झाली होती. याचा फायदा घेत गर्दीतील महिलेने वैष्णवीच्या गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची पोत तोडून घेतली.
तर, दुसऱ्या एका घटनेत नाथमंदिराच्या कमानीजवळ वृद्ध महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत तोडून नेण्यात आली. या प्रकरणी सुमन गोजरे यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस नाईक गोपाळ पाटील यांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरविंद गटकुळ हे तपास करीत आहेत.