महिलांचे आरोग्य जपण्यास स्त्री रुग्णालय उपयुक्त ठरेल
By Admin | Published: August 24, 2014 11:13 PM2014-08-24T23:13:25+5:302014-08-24T23:52:38+5:30
परभणी: जिल्ह्यातील महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यास प्राधान्य देणे गरजेचे असून त्या दृष्टीने हे स्त्री रुग्णालय नक्कीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी केले.
परभणी: जिल्ह्यातील महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यास प्राधान्य देणे गरजेचे असून त्या दृष्टीने हे स्त्री रुग्णालय नक्कीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी केले.
शहरातील दर्गा रोड परिसरात स्त्री रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे भूमिपूजन राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते २५ आॅगस्ट रोजी झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास आ. रामराव वडकुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंमरे, मनपा आयुक्त अभय महाजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके, स्त्री रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. बी. एन. कनकुटे, डॉ. प्रफुल्ल पाटील, कार्यकारी अभियंता एस. बी. सोलनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यमंत्री फौजिया खान म्हणाल्या, जिल्हा रुग्णालयात विविध सोयी-सुविधांमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वाढ लक्षात घेता स्वतंत्र स्त्री रुग्णालयासाठी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करण्यात आले. ६० खाटांवरुन १०० खाटांवर या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले. आता ३०० खाटांचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावत आहे. आरोग्य सेवांसाठी विविध प्रकारच्या भौतिक सुविधा निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना आ.वडकुते म्हणाले, नवीन स्त्री रुग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर स्त्री रुग्णांना नक्कीच लाभ होणार आहे. डॉ. प्रफुल्ल पाटील म्हणाले, महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय अत्यावश्यक झाले आहे. राज्यात अन्यत्र अशी रुग्णालये आहेत. अशा सर्व रुग्णालयात परभणीचे स्त्री रुग्णालय आपला वेगळा ठसा निर्माण करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, परभणीत ३०० खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्यात येत आहे. २.५ एकर जागा पशूसंवर्धन विभागाकडून प्रत्यार्पित करुन जिल्हा शल्यचिकित्सक यांना मंजूर केलेल्या स्त्री रुग्णालयाच्या बांधकामासाठी ही जागा हस्तांतरित केली आहे. (प्रतिनिधी)