‘वूमन इन ॲग्रीकल्चर’; लग्नाआधी माहिती नव्हती शेती,आज त्यांच्या शाश्वत शेतीचे लाखो फॉलोअर्स
By बापू सोळुंके | Published: October 27, 2023 06:15 PM2023-10-27T18:15:39+5:302023-10-27T18:16:36+5:30
शाश्वत शेतीचा प्रचार करणाऱ्या सविता डकले यांचे साडेसात लाख फॉलोअर्स
छत्रपती संभाजीनगर : लग्न होईपर्यंत शेतात पायसुद्धा न ठेवलेल्या पेंडगाव (ता. फुलंब्री) येथील सविता डकले या लग्नानंतर पतीसोबत शेतीमध्ये रमल्या. शेती ही नोकरीपेक्षा कमी नाही, असे सांगणाऱ्या सविता यांनी गावातील महिलांनाही सक्षम आणि डिजिटल साक्षर बनविण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. शेती करताना त्यांना आलेल्या विविध समस्यांवर त्यांनी उपायही शोधले. कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी त्यांनी केलेला शाश्वत शेतीचा प्रयोग यशस्वी झाला. आपल्या ज्ञानाचा इतरांना लाभ व्हावा, यासाठी त्यांनी सहा वर्षांपूर्वी फेसबुकवर सुरू केलेल्या त्यांच्या पेजचे आज साडेसात लाख फॉलोअर्स आहेत.
‘वूमन इन ॲग्रीकल्चर’ या नावाने सविता डकले सोशल मीडियावर परिचित आहेत. दहावीपर्यंत शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या सविता यांचे लग्न २० वर्षांपूर्वी पेंडगाव येथील सुनील डकले यांच्यासोबत झाले. यानंतर त्या पती आणि सासू, सासऱ्यांसोबत शेतात जाऊ लागल्या. त्यांच्याकडूनच त्या शेतातील कामे शिकल्या. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या सविता कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे घ्यावे, यासाठी विचार करू लागल्या. रासायनिक खत, कीटकनाशक यांचा वापर केल्याने उत्पादन खर्च वाढतो, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी शेतात विविध प्रयोग सुरू केले. यातच त्यांनी रासायनिक खताऐवजी कंपोस्ट खत, गांडूळ खत, रासायनिक कीटकनाशकाऐवजी लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्काचा वापर करू लागल्या. त्यांच्या या शाश्वत शेतीच्या प्रयोगाला यश आले.
कमी खर्चात उत्पादन वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. ग्रामीण भागात कुटुंबीयांसोबत शेतात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. सुरूवातीला त्यांनी गावातील काही महिलांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला. गावात एका सेवाभावी संस्थेच्या कामात त्या सहभागी झाल्या. महिलांचा बचतगट स्थापन केला. महिलांना प्रशिक्षण देण्यास त्यांनी सुरूवात केली. बँकेत खाते उघडणे, आधार लिंक करणे, ‘फोन पे’सारखे ऑनलाइन पेमेंट ॲप्लिकेशन कसे वापरायचे, याबाबतचे प्रशिक्षण दिले. फेसबुकवर अकाऊंट सुरू केले. तेथेही त्या शेतीविषयी पाेस्ट शेअर करू लागल्या. नंतर त्यांनी फेसबुकवर ‘वूमन इन ॲग्रीकल्चर’ हे पेज सुरू केले.
आयआयटी पवईमध्ये व्याख्यान
सविता यांना काही महिन्यांपूर्वी आयआयटी, पवई यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी तेथे व्याख्यान दिले होते. शिवाय त्यांच्या वाढत्या फॉलोअर्सची संख्या पाहता, फेसबुकच्या दिल्ली कार्यालयाने त्यांना सन्मानित केले.