तान्ह्या बाळाला पाळण्यात सोडून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 05:50 PM2017-07-31T17:50:16+5:302017-07-31T17:51:27+5:30
रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करणा-या लोकांना दिल्लीगेटच्या बाजूने सलीम अली सरोवरमध्ये अनोळखी महिलेचे प्रेत आढळले होते. आत्महत्या केलेल्या महिलेने सहा महिन्याच्या तान्हुल्या बाळाला पाळण्यात ठेवून घरगुती कारणावरुन आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. ३० : सलीम अली सरोवरमध्ये रविवारी (दि. 30 ) सकाळी प्रेत आढळलेल्या महिलेची ओळख पटविण्यात सिडको पोलिसांना यश आले. आत्महत्या केलेल्या महिलेने सहा महिन्याच्या तान्हुल्या बाळाला पाळण्यात ठेवून घरगुती कारणावरुन आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
अंजना दत्ता वाडेकर(२७,रा. आयोध्यानगर, सिडको)असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याविषयी सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करणा-या लोकांना दिल्लीगेटच्या बाजूने सलीम अली सरोवरमध्ये अनोळखी महिलेचे प्रेत आढळले होते. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलीस हेड कॉन्स्टेबल हमीद यांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान अयोध्यानगर येथून घरातून गायब झालेल्या अंजना यांचे हे प्रेत असल्याचे समोर आले.
अंजना यांचा पती खाजगी विमा कंपनीत कामाला आहे. सात वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला. त्यांना पाच वर्षाची मुलगी आणि ६ महिन्याचा मुलगा आहे. घरगुती कारणावरुन अंजना आणि त्यांच्या सासरच्या लोकामध्ये वाद होत. या वादातून दोन दिवसापूर्वी अंजना हिने तिच्या चिमुकल्या बाळाला पाळण्यात झोपू घातले आणि त्यानंतर ती घराबाहेर पडली. तेथून ती थेट सलीम अली सरोवरावर गेली. सरोवराच्या काठावर चप्पल उतरून तिने थेट पाण्यात उडी मारून मृत्यूला कवटाळले.
दुस-या रविवारी सकाळी दिवशी तिचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. इकडे अचानक घरातून गायब झालेली अंजना रागाच्या भरात माहेरी गेली असेल,असे समजून तिच्या तिच्या पतीने सासुरवाडी आणि अन्य ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र ती त्यांना कोठेच आढळली नव्हती. आज ते पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना सलीमअली सरोवरात सापडलेले प्रेत पाहून घ्या,असा सल्ला दिला. नातेवाईकांनी घाटीत जाऊन प्रेत पाहिले आणि हंबरडा फोडला. अंजना हिचेच ते प्रेत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. नंतर तिचे शवविच्छेदन करण्यात आले.